नंदुरबार, 28 सप्टेंबर (हिं.स.) उधना ते ब्रह्मपूर अमृत भारत एक्सप्रेस या नवीन रेल्वेगाडीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते लोकार्पण झाले. ही रेल्वे गाडी नंदुरबार रेल्वे स्टेशनवर आली असता संसद रत्न माजी खासदार डॉ. हिना गावित, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉ. सुप्रिया गावित यांनी हिरवी झेंडी दाखविली. त्यानंतर रेल्वे गाडी पुढे रवाना झाली.
याप्रसंगी, डॉ. हिना गावित यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आणि केंद्र सरकारचे आभार मानून पुढे सांगितले की, देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात जाण्यासाठी आता नंदुरबार येथून रेल्वे गाड्या उपलब्ध झाल्या आहेत. उधना ब्रह्मपूर एक्सप्रेसमुळे त्यात आणखी भर पडली. या नवीन एक्सप्रेसला देखील नंदुरबार येथे थांबा देण्यात आला आहे. त्यामुळे येथून थेट जगन्नाथ पुरीला जाण्यासाठी नंदुरबार येथील भक्तगणांची मोठी सोय झाली आहे. ब्रह्मपूर-उधना अमृत भारत एक्सप्रेस ही पाच राज्यांना जोडेल. यात ओडिशा, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र आणि गुजरातचा समावेश आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर