काबुल, 29 सप्टेंबर (हिं.स.)।भारताने आशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यात पाकिस्तानचा पराभव केला. टीम इंडियाने विजयानंतर आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे चेअरमन मोहसिन नकवी यांच्या हातून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. अफगाणिस्तानच्या निर्वासित खासदार मरियम सौलेमंखिल यांनी भारतीय संघाच्या या निर्णयाचं जोरदार कौतुक केलं आहे. त्यांनी दहशतवादाला निधी पुरवण्याच्या मुद्द्यावरही कठोर प्रतिक्रिया दिली आहे.
मरियम सौलेमंखिल यांनी एक्स पोस्टद्वारे म्हटलं, “भारताच्या संघाने शहाणपण दाखवलं. त्यांनी पाकिस्तानचे गृह मंत्री मोहसिन नकवी यांच्या हातून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. जे हात दहशतवादाला निधी पुरवतात, त्यांच्याकडून बक्षीस का घ्यावा? इतर संघांनी भारताकडून शिकायला हवं. जगाने हे ढोंग थांबवायला हवं की हे सगळं सामान्य आहे.”
भारताने पाकिस्तानला अंतिम सामन्यात धूळ चारली. सामना संपल्यानंतर मोहसिन नकवी आशियाई क्रिकेट परिषदेतील इतर अधिकाऱ्यांसह ट्रॉफी देण्यासाठी स्टेजवर आले, पण भारतीय संघाकडून कोणीही ट्रॉफी स्वीकारण्यासाठी पुढे आलं नाही. नकवी काही वेळ स्टेजवर थांबले, पण जेव्हा समजलं की कोणी येणार नाही, तेव्हा त्यांना माघारी जावं लागलं.
पाकिस्तानला आशिया कप 2025 मध्ये दुहेरी धक्का बसला आहे. पाकिस्तानी संघाने भारताविरुद्ध या स्पर्धेत तीन सामने खेळले आणि एकाही सामन्यात विजय मिळवू शकला नाही. भारताने पहिल्या सामन्यात 7 गडी राखून विजय मिळवला, दुसऱ्या सामन्यात 6 गडी राखून पराभव केला आणि अंतिम सामन्यात 5 गडी राखून हरवलं.
पाकिस्तानला एकीकडे सलग तीन पराभवांचा सामना करावा लागला आणि दुसरीकडे मोहसिन नकवी यांची मोठी अपमानास्पद स्थिती झाली. अशा प्रकारे पाकिस्तान दुबईहून दुहेरी अपयश घेऊन परतला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode