परभणी, 29 सप्टेंबर (हिं.स.)। लोअर दुधना प्रकल्पातून सुरू असलेल्या या विसर्गामुळे वालूर (ता. सेलू) गावाचा तिन्हीही बाजूंनी संपर्क तुटला आहे. गावाकडे जाणारे राजवाडी–सेलू, मानवत–वालूर आणि मोरेगाव–वालूर हे रस्ते पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे गावातील नागरिक पूर्णपणे वेढ्यात आले असून दळणवळण ठप्प झाले आहे.
यामुळे शालेय विद्यार्थी, शेतकरी आणि कामासाठी बाहेर जाणारे नागरिक अडचणीत आले आहेत. वैद्यकीय आपत्कालीन सेवा व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा खंडित होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महसूल, आपत्ती व्यवस्थापन व पाटबंधारे विभाग सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.
निम्न दुधना प्रकल्पातून सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गात घट करण्यात आली आहे. पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असला तरी सध्याची आवक पाहता काही गेट्स बंद करण्यात आले असून, धरणातून होणारा विसर्ग लक्षणीयरीत्या कमी झाला आहे.
धरण प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, गेट क्रमांक 01, 02, 03, 04, 17, 18, 19 व 20 मधून 5,360 क्युसेक्स विसर्ग सुरू होता. मात्र पाण्याची आवक घटल्यामुळे गेट क्रमांक 02, 03, 04, 17, 18 व 19 बंद करण्यात आले असून आता फक्त गेट क्रमांक 01 व 20 मधून मिळून 1,340 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. धरणातील पाण्याच्या आवकेनुसार पुढील काळात विसर्ग वाढवणे अथवा कमी करण्याची कार्यवाही केली जाणार असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis