लातूर, 29 सप्टेंबर (हिं.स.)
संपूर्ण लातूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे झालेले मोठे नुकसान आणि सर्वत्र निर्माण झालेली जलमय परिस्थिती यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. हातातोंडाशी आलेले पीक अक्षरशः पाण्यात बुडाले असताना, या कठीण काळात अहमदपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा शिवसेना (ठाकरे गट) विधानसभा संघटक संतोष रोडगे यांनी आपल्या संवेदनशीलतेतून सामाजिक बांधिलकीचा एक अनोखा आदर्श घालून दिला आहे.
दुःख बाजूला ठेवून शेतकऱ्यांसाठी पुढाकार
गेल्या तीन दिवसांपूर्वीच संतोष रोडगे यांच्या वडिलांचे निधन झाले होते. हा मोठा वैयक्तिक आघात असतानाही, त्यांनी स्वतःचे दुःख बाजूला ठेवले. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान आणि त्यांची वेळेवर मदतीची तळमळ पाहून, त्यांनी मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तातडीने पुढाकार घेतला.
शेतकऱ्यांप्रती असलेली त्यांची जबाबदारीची भावना यातून प्रकर्षाने अधोरेखित झाली.
तात्काळ पाहणी आणि मदतीचा हात
रोडगे यांनी तातडीने कृषी अधिकारी बावगे यांना बोलावून घेतले आणि गावांमधील शेतातील नुकसानीची पाहणी केली. शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसानभरपाई मिळावी, यासाठी त्यांनी तत्परतेने पाऊले उचलली.
केवळ पीक पाहणीच नव्हे, तर माणुसकीच्या नात्याने त्यांनी मानखेड येथील दहा निराधार कुटुंबांना प्रत्येकी दहा किलो धान्य देऊन मदतीचा हात दिला. पितृशोकात असतानाही, शेतकऱ्यांसाठी आणि गरजूंसाठी धावून जाण्याची ही कृती त्यांच्या सामाजिक बांधिलकीची आणि शिवसैनिक म्हणून असलेल्या कर्तव्याची जाणीव करून देणारी आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis