अमरावती, 29 सप्टेंबर (हिं.स.)संपूर्ण अमरावती जिल्ह्यात गेल्या काही आठवड्यांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतातील कापूस, सोयाबीन, ज्वारी, संत्री आदी पिकांचे अतोनात नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर माजी खासदार नवनीत राणा यांनी दर्यापूर व अंजनगाव सुर्जी तालुक्यातील गावागावांत जाऊन बांधावरून नुकसानीची पाहणी केली. पाहणीदरम्यान, त्यांनी राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे व अमरावती जिल्हाधिकारी यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून अमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा व सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई द्यावी, अशी स्पष्ट मागणी केली. खासदार नवनीत राणा यांनी सांगितले की, आधीच कर्जबाजारी असलेल्या शेतकऱ्यांनी मेहनतीने पेरणी केली होती, पण अतीवृष्टीमुळे शेतकऱ्यांचा सर्व आशेचा किरण नष्ट झाला आहे. शेतकऱ्यांचे संपूर्ण पीक उद्ध्वस्त झाल्यामुळे त्यांचा दिवाळीसारखा मोठा सणही संकटात सापडला आहे.यावेळी त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली की, शेतकऱ्यांना शक्य तितकी जास्तीत जास्त नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळावी. या पाहणी दौऱ्यात दर्यापूर तालुक्यातील आमला, थिलोरी, माऊली, खल्लार, कोकर्डा, लेहगाव, सामदा, सांगळुद, सासन, सागंवा, चिचोंली, चिचोंरी रहिमापुर तसेच अंजनगाव सुर्जी तालुक्यातील सातेगाव, गावंडगाव, काळगव्हाण, हिंगणी, चिचोली, टाकरखेड, धनेगाव, पांढरी, कापूस तळणी, हंतोडा, विहीगाव, दहीगाव रेचा, लखाळ, भंडारज, कोकर्डा इत्यादी गावांचा समावेश होता.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी