इस्लामाबाद , 29 सप्टेंबर (हिं.स.)।भारताने आशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यात पाकिस्तानचा 5 गडी राखून पराभव केला. दुबईमध्ये खेळल्या गेलेल्या या अंतिम सामन्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीम इंडियाला विजयासाठी शुभेच्छा दिल्या आणि “ऑपरेशन सिंदूर”चा उल्लेख केला. पंतप्रधान मोदींच्या सोशल मिडिया पोस्टनंतर पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांना तीव्र प्रतिक्रिया आली. त्यांनी या पोस्टवर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, अशा प्रकारे शांतता प्रस्थापित होणार नाही.
ख्वाजा आसिफ यांनी पीएम मोदींच्या एक्स पोस्टबद्दल लिहिलं, ‘‘क्रिकेटची संस्कृती आणि भावना नष्ट करून, मोदी आपली राजकीय पोझिशन वाचवण्यासाठी उपखंडामधील शांतता आणि समस्यांवर उपाययोजना होण्याच्या शक्यतांना संपवत आहेत. अशा पद्धतीने ना शांतता प्रस्थापित होते, ना सन्मान. पाकिस्तान-भारत युद्धाचा स्कोअर 6/0 होता. आम्ही काहीही बोलत नाही, पण मोदींना भारतात आणि जगात अपमान सहन करावा लागला आहे.’’
ख्वाजा आसिफ यांच्या या पोस्टमध्ये विशेष बाब म्हणजे, अवघ्या 72 तासांपूर्वीच पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी संयुक्त राष्ट्र महासभेच्या व्यासपीठावर दावा केला होता की, पाकिस्तानच्या सैन्याने भारतासोबतच्या 4 दिवसांच्या युद्धात भारतीय वायुसेनेची 7 लढाऊ विमाने पाडली होती. पण आता 72 तासांनंतर त्यांच्या स्वतःच्या संरक्षण मंत्र्यांनी 6 विमाने पाडल्याचा दावा केला आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान सरकारने अनेकदा खोटं बोललेलं आहे. त्यांनी वारंवार भारतीय विमानं पाडल्याचे खोटे दावे केले आहेत. महत्त्वाचं म्हणजे, त्यांच्या दाव्यांतील आकडेही वारंवार बदलत आहेत.
पंतप्रधान मोदींनी अंतिम सामन्यात भारताच्या विजयानंतर एक्सवर एक पोस्ट शेअर केली होती. त्यांनी लिहिलं होतं, ‘‘खेळाच्या मैदानावर ऑपरेशन सिंदूर. निकाल तोच आहे. भारताचा विजय. आपल्या क्रिकेटपटूंना विजयासाठी हार्दिक शुभेच्छा.’’
आशिया कपच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने पहिले फलंदाजी करताना 146 धावा केल्या. त्याला प्रत्युत्तर देताना भारताने 19.4 षटकांत 5 गडी गमावून सामना जिंकला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode