अमरावती : पिंगळादेवीच्या गडावर आज अंबादेवीची खापरी तप्त मडके घेऊन प्रदक्षिणा
अमरावती, 29 सप्टेंबर (हिं.स.) : मातीच्या मडक्याला शुद्ध करून अग्निदेवताला साक्षी ठेऊन पिंगळादेवी सामग्रीचे हवन आणि होमहवनाने लाल तप्त झालेले मडके म्हणजे खापरी. ही खापरी बघण्याची विदर्भवासीयांना उत्सुकता लागली आहे. अंगावर शहारे आणणारा भक्तांना आश्चर्य
उदो ग अंबे उदोचा गजर... पिंगळादेवीच्या गडावर आज अंबादेवीची खापरी  तप्त मडके घेऊन प्रदक्षिणा


अमरावती, 29 सप्टेंबर (हिं.स.) : मातीच्या मडक्याला शुद्ध करून अग्निदेवताला साक्षी ठेऊन पिंगळादेवी सामग्रीचे हवन आणि होमहवनाने लाल तप्त झालेले मडके म्हणजे खापरी. ही खापरी बघण्याची विदर्भवासीयांना उत्सुकता लागली आहे. अंगावर शहारे आणणारा भक्तांना आश्चर्यचकीत करणारा असा हा सोहळा आहे. लालबुंद खापरी ब्राम्हण पुजारी तळहातावर, डोक्यावर घेऊन सुसाट वेगाने देवीला प्रदक्षिणा लावतो. तळहाताला, डोक्याला कुठलीच इजा होत नाही. ही खापरी आज सोमवार २९ सप्टेंबरला सप्तमीसह अष्टमीला रात्री १२ वाजता उचलली जाणार आहे. दोनशे वर्षाच्या परंपरेनुसार खापरीचा कार्यक्रम होत आहे. ब्राम्हण पुजारी नारायणराव शंकरराव मारुडकर हे कुटुंबासह नवरात्र महोत्सवात पिंगळादेवीची पूजाअर्चा श्रृंगारासाठी व आराधनेसाठी दाखल झाले आहेत. ७५ वर्षीय नारायणराव मारूडकर वयाच्या चौदाव्या वर्षीपासून खापरी उचलत आहे. परंतु आता त्यांचे सुपुत्र महेश नारायणराव मारूडकर यांना खापरी उचलण्याचा मान मिळाला आहे. भक्तांचे दुःख दूर व्हावे, त्यांच्यावरील संकट टळावे, देवीचा आशिर्वाद भक्तांवर राहावा, याकरिता खापरी मध्ये होमहवन करून देवी प्रसन्न व्हावी यासाठीच केली जाते. आतमध्ये कापूराचा दीप अग्निदेवतेला साक्षी मानून प्रज्वलित केला जातो. सप्तशक्तीचा पाठ होतो.सोळा प्रकारच्या सामग्रीचे हवन सोबतच तुपाची आहुती दिली जाते. चार तासापेक्षा जास्तवेळ हवन होत असल्याने मडके लालबंद होते. या पात्रालाच अंबादेवीची खापरी म्हटले जाते. ही खापरी महेश मारुडकर तळहातावर किवा डोक्यावर घेतात. त्यावेळी त्यांच्यासमोर त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती पेटती मशाल घेऊन चालतात. ढोल, टाळांच्या गजरात सुसाट वेगाने देवीच्या मंदिराला पाच किवा अकरा प्रदक्षिणा घातल्या जातात. अंगावर शहारे आणणारा हा प्रकार असला तरी नारायणराव व त्यांचे सुपुत्र महेश यांना आजपर्यंत कुठलीच इजा झाली नाही. देवीची शक्तीच त्यांच्या साथीला राहते, असा भाविकांचा विश्वास आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande