अमरावती, 30 सप्टेंबर (हिं.स.)।भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सह-संयोजक व शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर भोयर यांनी आज खामगाव शहरातील विविध शाळांना भेट देत शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि मुख्याध्यापकांशी थेट संवाद साधला. या दौऱ्यात त्यांनी शैक्षणिक व प्रशासकीय पातळीवरील अनेक गंभीर प्रश्नांची प्रत्यक्ष माहिती घेतली.
शिक्षकांनी आपल्या अडचणी मांडताना पगार वितरणातील विलंब, प्रशासकीय निर्णयातील अनिर्बंध ढिलाई, शासकीय निधीचा अभाव, सेवा पुस्तिकेतील अपूर्ण नोंदी आणि शासकीय योजनांच्या अंमलबजावणीत होत असलेले दुर्लक्ष असे अनेक मुद्दे मांडले.या वेळी बोलताना भोयर म्हणाले की शिक्षकांना वेळेवर पगार न मिळणे ही प्रशासनाची लाजिरवाणी बाब आहे. मी या प्रश्नांवर शासनदरबारी ठोस आवाज उठवणार असून, शिक्षकांना न्याय मिळवून देणे ही माझी निवडणूकपूर्व बांधिलकी राहील.विशेषतः दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शाळेला दिलेल्या भेटीत त्यांनी पायाभूत सुविधा, मनुष्यबळ आणि विद्यार्थ्यांच्या गरजांविषयी प्रत्यक्ष पाहणी केली. अनेक गंभीर समस्या वर्षानुवर्षे प्रलंबित असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांकडे दुर्लक्ष सहन केले जाणार नाही. शासनस्तरावर ठोस पाठपुरावा करून हे प्रश्न तातडीने मार्गी लावले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.या दौऱ्याला शिक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शेकडो शिक्षक, मुख्याध्यापक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी भोयर यांच्यासमोर आपले प्रश्न मांडले. यावर त्यांनी सर्व तक्रारींची नोंद घेतली असून, संबंधित विभागांना लेखी निवेदन देऊन वैयक्तिक पातळीवर प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.यावेळी त्यांनी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिक्षक मतदारांशी थेट संवाद साधत म्हटले की, शिक्षक मतदारसंघ हा निर्णायक ठरणार आहे. शिक्षकांचा सन्मान आणि त्यांच्या समस्या सोडवणे हेच आमचे ध्येय राहील.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी