बबलू देशमुख गटाची सहकार विभागाकडे तक्रार
अमरावती, 30 सप्टेंबर (हिं.स.) : अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची आमसभा ही संचालक मंडळाने ठरवून दिलेल्या वेळ, स्थळ व विषयाप्रमाणे नसून अल्पमतातील संचालक वे अध्यक्ष यांनी खोटा ठराव लिहून आयोजित केलेली सभा आहे. त्यामुळे मंगळवारी होणारी सभा नियमबाह्य असल्याचा आरोप बबलू देशमुख गटातील ११ संचालकांनी केला आहे. याबाबत त्यांनी सहकार विभागाकडे तक्रार दिली आहे. बँकेला ३० सप्टेंबरच्या आधी वार्षिक साधारण सभा घेणे कायद्याने बंधनकारक आहे. या सभेकरिता वेळ, काळ, स्थळ आणि विषय निश्चित करण्याचे अधिकार उपविधी व सहकार कायद्याने संचालक मंडळ सभेस दिलेले आहे. संचालक मंडळाच्या सभेत बबलू देशमुख गटातील बहुमतातील ११ संचालकांनी आमसभेकरिता २८ सप्टेंबरची तारिख निश्चित केली होती. याकरिता बँक परिसरात विभागीय सहकारी बोर्डचे सभागृहाचे स्थळ देखील निश्चित केले होते. याचा बहुमताने ठराव पारित केला. परंतु सभाध्याक्षांनी खोट्या ठरावाचे लिखाण करून ३० सप्टेंबर रोजी सभेचे आयोजन केले, असा आरोप बबलू देशमुख गटातील संचालकांनी केला आहे. मंगळवारी ३० सप्टेबरला होणारी ही आमसभा नियमबाह्य असल्याचा दावा करीत याबाबत सहकार विभागाकडे तक्रारी दाखल करण्यात आल्याचे बँकेचे संचालक बबलू देशमुख यांनी सांगितले. रिझर्व बँक ऑफ इंडियाने संचालकांना बँकेमधून कर्ज घेण्यास मनाई केलेली असतानासुद्धा आनंद काळे यांना ५० लाखांच्या कर्जाचे वाटप केले होते. मात्र याबाबत तक्रार झाल्याने ते तातडीने जमा करण्यात आल्याचाही आरोप तक्रारीतून करण्यात आला आहे. आमसभेत भेटवस्तू वाटपाची तक्रार यापुर्वी सत्ताधारी गटाचे आनंद काळे व अजय मेहकरे यांनी सुधाकर भारसाकळे अध्यक्ष असताना केली होती. याकरिता तत्कालिन अध्यक्षांना चौकशीला सामोरे जावे लागले होते. आता सत्ताधारी भेटवस्तुंबाबत आग्रह का असा प्रश्न देखील तक्रारीतून विरोधकांनी उपस्थित केला आहे. ---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी