नेपीडॉ, 30 सप्टेंबर, (हिं.स.)। भारताचा शेजारी देश म्यानमारमध्ये मंगळवार (३० सप्टेंबर २०२५) रोजी पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ४.७ इतकी नोंदवण्यात आली आहे. हे धक्के भारताच्या ईशान्येकडील राज्यांमध्येही जाणवले, ज्यामध्ये मणिपूर, नागालँड आणि आसाम यांचा प्रमुख समावेश होता.
नॅशनल सेंटर ऑफ सिस्मॉलॉजी (एनसीएस) नुसार, हा भूकंप भारत-म्यानमार सीमेजवळ सकाळी ६:१० वाजता झाला. या भूकंपाचे केंद्र मणिपूरच्या उखरूल शहरापासून दक्षिण-पूर्वेला २७ किलोमीटर अंतरावर, जमिनीपासून १५ किलोमीटर खोल होते. ही जागा नागालँडमधील व्होखा शहरापासून दक्षिण-दक्षिणपूर्वेला १५५ किलोमीटर आणि दीमापूरपासून १५९ किलोमीटर दक्षिण-पूर्वेला आहे.
राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्रानुसार, म्यानमारमधील हा भूकंप भारताच्या सीमेपासून अगदी जवळ, मणिपूरमधील उखरूलपासून फक्त २७ किलोमीटर दक्षिण-पूर्वेला आला. एनसीएसनुसार, या भूकंपाचे अचूक निर्देशांक अक्षांश २४.७३ उत्तर आणि रेखांश ९४.६३ पूर्व होते.
भूकंपाच्या धक्क्यांमुळे ईशान्य भारतातील काही भागांमध्ये लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं, मात्र सध्या तरी कोणतीही जीवितहानी किंवा मोठं नुकसान झाल्याची बातमी आलेली नाही. प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode