भारतीय उच्चायोगाकडून चौकशीची मागणी
लंडन, 30 सप्टेंबर (हिं.स.)।ब्रिटनच्या राजधानी लंडनमध्ये सोमवारी(दि.२९) महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची तोडफोड करण्यात आली. ही घटना गांधी जयंतीच्या तीन दिवस आधी घडली आहे. लंडनमधील टॅव्हिस्टॉक स्क्वेअरवर असलेल्या बापूंच्या ध्यानमग्न अवस्थेतील पुतळ्याला काही अज्ञात लोकांनी नुकसान पोहोचवलं. भारतीय उच्चायोगाने ही माहिती तातडीने सुरक्षा यंत्रणांना दिली आहे. पुतळ्याच्या चबुतऱ्यावर काही आक्षेपार्ह गोष्टीही लिहिल्या गेल्याचं समोर आलं आहे. सध्या लंडन पोलिस या घटनेबाबत तपास करत आहेत.
लंडनच्या टॅव्हिस्टॉक स्क्वेअर या प्रसिद्ध चौकात महात्मा गांधींचा ध्यानमग्न अवस्थेतील पुतळा उभारण्यात आला आहे. भारतीय मिशनने सांगितलं की राष्ट्रपित्याच्या या स्मारकाची दुरुस्ती सुरू आहे आणि सुरक्षा यंत्रणांकडून दोषींना शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भारतीय उच्चायोगाने म्हटलं आहे की, लंडनमधील टॅव्हिस्टॉक स्क्वेअर येथे महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची झालेली तोडफोड अत्यंत दुःखद आहे. अशा प्रकारच्या घटनांची तीव्र शब्दांत निषेध केला गेला पाहिजे. ही केवळ एक साधी तोडफोड नाही, तर आंतरराष्ट्रीय अहिंसा दिनाच्या तीन दिवस आधी, अहिंसेचे पुजारी महात्मा गांधी आणि त्यांच्या वारसावर झालेला एक थेट हल्ला आहे.या घटनेनंतर उच्चायोगाने तातडीने स्थानिक सुरक्षा एजन्सींशी संपर्क साधला असून, उच्चायोगाची एक टीम पुतळा दुरुस्त करण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांसोबत काम करत आहे.
युनायटेड नेशन्सने गांधी जयंतीला आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस म्हणून घोषित केले आहे. दरवर्षी या दिवशी लंडनमधील या स्मारकाजवळ पुष्पांजली अर्पण केली जाते आणि गांधीजींचे आवडते भजन गायलं जातं. इंडिया लीग या संस्थेच्या सहकार्याने उभारण्यात आलेल्या या कांस्य पुतळ्याचे अनावरण १९६८ साली करण्यात आले होते. हा पुतळा महात्मा गांधींनी लंडनमधील युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये कायद्याचे शिक्षण घेत असताना त्या काळाच्या स्मरणार्थ उभारण्यात आला आहे.सध्या या प्रकरणाची चौकशी मेट्रोपॉलिटन पोलीस आणि स्थानिक कॅमडेन कौन्सिलचे अधिकारी करत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode