इस्लामाबाद, 30 सप्टेंबर, (हिं.स.)। पाकिस्तानच्या क्वेटा परिसरात मंगळवारी(दि.३०) एक जोरदार स्फोट झाला. या स्फोटात १३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. वृत्तानुसार, पाकिस्तानी लष्कराच्या गाडीला लक्ष्य करून हा स्फोट घडवून आणण्यात आला. हा स्फोट क्वेटा शहरातील फ्रंटियर कॉर्प्स (एफसी) मुख्यालयाजवळ झाला. या स्फोटात १५ हून अधिक लोक जखमी झाले आहेत.
समोर आलेल्या व्हिडीओमध्ये दिसून येत आहे की, अचानक रस्त्याच्या मधोमध स्फोट होतो आणि चारही बाजूंना प्रचंड धुळ पसरते. विशेष बाब म्हणजे हा स्फोट जारघून रोडवर असलेल्या एफसी मुख्यालयाजवळच झाला.स्फोट इतका प्रचंड होता की आजूबाजूच्या इमारतींचे काचेचे दरवाजे-खिडक्या फुटल्या. अहवालात असंही नमूद केलं आहे की, स्फोटानंतर काही वेळातच गोळ्यांचाही आवाज ऐकू आला, ज्यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
स्थानिक प्रशासन सध्या या स्फ़ोटामागचे कारण शोधत आहे. सोशल मीडियावर एक सीसीटीव्ही व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे, ज्यामध्ये लोकांनी भरलेल्या परिसरात अचानक स्फोट होताना दिसतो.स्फोटाची तीव्रता लक्षात घेऊन सर्व स्थानिक रुग्णालयांमध्ये आपत्कालीन सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. मदत व बचाव कार्य सुरू असून, घटनास्थळी मदत पथक दाखल झाले आहे. संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे असून या घटनेत आरोपी असलेल्यांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode