जकार्ता, 30 सप्टेंबर (हिं.स.)।इंडोनेशियाच्या सिदोआर्जो शहरात सोमवारी(दि.२९) एका इस्लामिक शाळेची इमारत कोसळल्याने एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असून किमान ६५ विद्यार्थी ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी या दुर्घटनेची माहिती दिली आहे. या अपघातानंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे पालक अत्यंत चिंतेत आहेत.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, सिदोआर्जोच्या ईस्ट जावा परिसरातील ‘अल खोजिनी इस्लामिक बोर्डिंग स्कूल’ ही इमारत कोसळल्याची माहिती मिळताच बचाव पथक, पोलीस आणि लष्करी जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि संपूर्ण रात्रभर मदत व बचाव कार्य चालू ठेवले. शाळेची इमारत जीर्ण अवस्थेत होती. घटनेला १२ तासांहून अधिक वेळ उलटूनही मंगळवारी सकाळपर्यंत विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरूच होते.
या घटनेत एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. किमान ६५ विद्यार्थी ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या सर्व विद्यार्थ्यांचे वय १२ ते १७ वर्षांच्या दरम्यान आहे. अपघातानंतर ८ तासांच्या आत पोलीस, लष्करी आणि बचाव पथकाने ८ जखमी विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात यश मिळवले आहे.
बचाव पथकांना या दरम्यान आणखी मृतदेहे आढळून आली असल्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रांतीय पोलीस प्रवक्ते ज्युल्स अब्राहम अबास्ट यांनी सांगितले की हे विद्यार्थी इमारतीत दुपारची नमाज अदा करत होते. या इमारतीचे अनधिकृतरित्या विस्तारकाम चालू असतानाच ती अचानक कोसळली.
बचावकार्य करत असलेल्या पथकानुसार, सिमेंटच्या जड पट्ट्या आणि ढिगाऱ्यामुळे मदत कार्यात मोठ्या अडचणी येत आहेत. जड यंत्रसामग्री उपलब्ध असली तरी तिचा वापर धोकादायक ठरू शकतो, कारण त्याने इमारतीचा आणखी भाग कोसळू शकतो. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांपर्यंत ऑक्सिजन आणि पाण्याचा पुरवठा सुरू आहे, जेणेकरून त्यांना जिवंत ठेवता येईल.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode