लातूर, 30 सप्टेंबर (हिं.स.)। आज सकाळी किल्लारीतील स्मृतिस्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून 1993 च्या महाप्रलयकारी भूकंपात मृत्यूमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना आमदार अभिमन्यू पवार यांनी विनम्र आदरांजली वाहिली. महाप्रलयकारी भूकंपाला 32 वर्ष पूर्ण झाले पण त्या काळरात्रीच्या भयदायी स्मृती आम्हाला आजही व्यथित करतात.
1993 च्या महाप्रलयकारी किल्लारी भूकंपात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली. भूकंपग्रस्त गावांमध्ये अशी एकही व्यक्ती नाही ज्यांच्या कुटुंबातील किंवा नात्यातील एखादी जिवलग व्यक्ती या आपत्तीमध्ये दगावली नाही. त्या काळरात्रीच्या स्मृती आजही मनाला वेदना देतात. किल्लारी भूकंपात आप्तेष्टांना गमावलेल्या नागरिकांप्रति संवेदना व्यक्त केल्या आहेत
किल्लारी भूकंप स्मरण दिन
'किल्लारी भूकंप' ज्याची आठवण आजही आपल्या सर्वांना हादरवून सोडते. १९९३ सालच्या ३० सप्टेंबरला भारतीय प्रमाणवेळे नुसार पहाटे ३.५६ वाजता लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यांत एक भूकंप झाला, त्याला लातूरचा भूकंप म्हटले जाते. या भूकंपाचे केंद्र सोलापूरच्या ईशान्येस ७० किमी अंतरावर होते. रिश्टर स्केलवर ६.०४ तीव्रता मोजला गेलेल्या ह्या भूकंपात अंदाजे ७९२८ माणसे मृत्युमुखी पडले, १५८५४ जनावरांचा मृत्यू झाला, तर सुमारे १६००० लोक जखमी झाले. ५२ गावांतील ३० हजार घरे पूर्णपणे जमीनदोस्त झाली तर १३ जिल्ह्यांतल्या २ लाख ११ हजार घरांना तडे गेले. उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा व लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यांना ह्या भूकंपाचा सर्वात जास्त फटका बसला. ह्या दोन तालुक्यांतील एकूण ५२ गावे उद्ध्वस्त झाली. ३० सप्टेंबर १९९३ ची रात्र आज ऐन विशी तिशीत असणाऱ्यांना कदाचित आठवत नसेल पण ती आजही अखंड महाराष्ट्राच्या मनात कुठेतरी भीतीचं गच्च आवरण घेऊन दडून बसली आहे. जवळपास १०,००० लोकांना एकाचवेळी आपल्या कुशीत घेणारी किल्लारीची धरती आज शांत निपचित पडून आहे. ३० सप्टेंबर १९९३ ची पहाट महाराष्ट्र कधीच विसरू शकत नाही. गणपती विसर्जनानंतरचा तो दिवस होता. सारा महाराष्ट्र साखर झोपेत असताना लातूर जिल्ह्यातील किल्लारी आणि आजूबाजूची गावं भूकंपाने हादरून गेली. हजारो लोक झोपेतच गाडले गेले.
--------------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis