लातूर, 30 सप्टेंबर (हिं.स.)।दररोज पुणे, मुंबईत पोहोचवणारी लातूर-मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेस आज 30 सप्टेंबर रोजी तब्बल 3 तास उशिराने धावली.
बार्शीत 00.10 वाजता पोहोचणारी ही ट्रेन पहाटे 3.08 वाजता बार्शीत पोहोचल्याने प्रवाशांची मोठी अडचण झाली. आपली रात्रीची झोप उडाल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला. तर, काहींनी प्रतीक्षालयातील अस्वच्छतेमुळे तीव्र नाराजी व्यक्त केली.
लातूर येथून पुणे, मुंबईसाठी दैनिक प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असून मंगळवारी रात्री 12 वाजून 10 मिनिटांनी येणारी ही ट्रेन चक्क 3 वाजून 08 मिनिटांनी बार्शी रेल्वे स्थानकावर पोहोचली. त्यामुळे, रात्रीच्या झोपेच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रवाशांची झोपच उडाली. सणानिमित्ताने सुरू केलेल्या पुणे - हरंगुळ फेस्टिव्हल ट्रेनमुळे हा खोळंबा होत असल्याची प्राथमिक माहिती आहे.
विशेष म्हणजे गेल्याच आठवड्यात मुसळधार पावसाने आलेल्या पुरामुळे ही ट्रेन तीन तास उशिराने धावली होती. त्यानंतर, आता पुन्हा ही गाडी उशिराने धावत असल्याने प्रवाशांनी मध्य रेल्वेवर तीव्र नाराजी दर्शवली. दरम्यान, ट्रेन 3 तास लेट असल्याने काही प्रवाशी प्रतिक्षालयात गेले होते, मात्र तिथेही स्वच्छतेचा मोठा अभाव दिसून आला. वेटिंग रूमचे बाथरूम आणि टॉयलेटही अस्वच्छ होते, त्यामुळे काही प्रवाशांनी स्टेशन परिसरात आभाळखाली येऊन तारे मोजत मोजत मध्य रेल्वे आणि बार्शी रेल्वे स्टेशनचे मनोमन कौतुक केले. तसेच, रेल्वे प्रवासी संघटनाने याकडेही लक्ष द्यावे अशी मागणीदेखील या प्रवाशांनी केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis