अमरावती, 30 सप्टेंबर (हिं.स.)।राजकमल रेल्वे उड्डाणपूलाच्या सुरक्षिततेबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिलेल्या निर्देशानुसार मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने तातडीने कार्यवाही केली आहे. उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद असला तरी रेल्वे वाहतुकीच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्याचे रेल्वे प्रशासनाने कळविले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटनुसार हा पूल वाहनांच्या वाहतुकीकरिता असुरक्षित घोषित करण्यात आला आहे. त्यानंतर 25 ऑगस्ट 2025 पासून या पुलावरील वाहनांची आणि पादचाऱ्यांची वाहतूक जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार बंद करण्यात आली आहे. पुलाखालून दररोज रेल्वे गाड्या धावत असल्याने संभाव्य आपत्तीचा धोका लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी दि. 18 सप्टेंबर 2025 रोजी रेल्वे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला संयुक्त पाहणी करून रेल्वे वाहतूक थांबवण्याबाबत किंवा वळवण्याबाबत अहवाल देण्याचे निर्देश दिले. त्यानुसार रेल्वे प्रशासनाने कार्यवाही केली आहे. रेल्वे विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग व स्ट्रक्चरल ऑडिट सल्लागार यांच्या संयुक्त पथकाने दि. 18 व 19 सप्टेंबर 2025 रोजी पुलाची पाहणी केली. त्यानुसार राजकमल पुलाखालून रेल्वे वाहतुकीला कोणताही तात्काळ धोका नाही. संयुक्त पाहणी अहवालानुसार, पुलावर वाहनांची वाहतूक पूर्णपणे थांबविल्यामुळे त्यावर कोणतेही 'गतिमान भारण' नाही. सध्या हा पूल फक्त स्वतःचे 'डेड लोड' घेण्यास सक्षम आहे. त्यामुळे पुलाखालून धावणाऱ्या रेल्वे वाहतुकीला कोणताही तात्काळ धोका नाही. परिणामी सध्या रेल्वे वाहतूक थांबवण्याची किंवा वळवण्याची गरज नाही.पुलामुळे संभाव्य निर्माण होणारा अपघात लक्षात घेता 24 तास निगराणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. याबाबत रेल्वे विभागाने पुलाच्या ठिकाणी संरचनात्मक बिघाडाच्या सर्व चिन्हावर त्वरित लक्ष ठेवण्यासाठी पूर्णवेळ वॉचमन तैनात करण्यात आला आहे. शहराच्या वाहतुकीतील रेल्वे पुलाचे महत्व लक्षात घेता पुलाच्या पुनर्बांधणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. रेल्वे पुलाचे 'डिसमँटलिंग' म्हणजेच पाडकाम (रेल्वे स्पॅन) करण्याची योजना अंतिम करण्याच्या आणि त्यासाठीचा खर्च अंदाजित करण्याच्या प्रक्रियेत आहे. तसेच पुलावरील वाहतुकीचे महत्त्व लक्षात घेता वेळेची मर्यादा पाळण्यात येणार आहे. यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यावर रेल्वे विभाग पुलाचे पाडकाम अंदाजित चार महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.रेल्वे विभागाने सार्वजनिक बांधकाम विभागाला आयआयटी, व्हीएनआयटीसारख्या संस्थांकडून पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्याची आणि 'टिल्ट मीटर्स', 'क्रॅक प्रोपगेशन गेजेस' यांसारख्या तांत्रिक मॉनिटरिंग प्रणाली बसवण्याची सूचना केली आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रतीक गिरी, रेल्वेचे उपविभागीय अभियंता श्रीकृष्ण गोमकाळे, सहाय्यक अभियंता एन प्रकाश रेड्डी स्ट्रक्चरल ऑडिट सल्लागार कन्स्ट्रक्शन मॅजिक यांनी संयुक्तपणे रेल्वे पुलाची पाहणी केली. सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलाची दोन भागात पाहणी केली. या पाहणीत बेलपुराकडील रेल्वे पुलाला बारीक तडे, तर रायली प्लॉटकडील संपूर्ण पुलाला तडे गेल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र सद्यस्थितीत पुलावरून कोणतीही वाहतूक होत नसल्याने पुलाखालील वाहतुकीला कोणताही धोका नाही. त्यामुळे ही वाहतूक सुरळीत सुरू राहील. पुलावरील वाहतुकीला प्रतिबंध घालण्यात आल्यामुळे पुलाच्या दोन्ही बाजूला भिंत उभारण्यात आली आहे. या ठिकाणी सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्यात आल्या आहे. तसेच पुलाजवळ कोणत्याही प्रकारची वाहने उभी करण्यास मनाई करण्यात आली आहे. रेल्वे पुल संरचनेच्या सुरक्षिततेची आणि देखरेखीची काळजी घेण्यात येत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने केलेल्या सूचना काटेकोरपणे पालन करण्यात येत आहे. तसेच आवश्यक ती खबरदारी घेण्यासाठी निर्देश देण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी