नांदेड, 30 सप्टेंबर (हिं.स.)।नांदेड तालुक्यातील राहेगाव येथील पुलावर पाणी आल्यामुळे राहेगावचा संपर्क तुटला होता. एसडीआरएफच्या मदतीने गावात विद्युत व वैद्यकीय उपचाराची व्यवस्था महसूल विभागाने तातडीने उपलब्ध करून दिली. आमदार आनंदराव बोंढारकर, नांदेडचे उपविभागीय अधिकारी डॉ.सचिन खल्लाळ , तहसीलदार संजय वारकड यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या मदत कार्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
राहेगावच्या पुलावर पाणी आल्यामुळे एक दोन दिवस वगळता मागील दहा दिवसापासून संपर्क तुटला आहे. तसेच मागील तीन दिवसापासून गावात विद्युत व्यवस्था खोळंबली होती. तसेच गावातील लोकांना वैद्यकीय उपचाराचीही बाब विचारात घेऊन तहसीलदार संजय वारकड यांनी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले , उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य आपत्ती प्रतिसाद दल (धुळे) यांचे पोलीस निरीक्षक प्रशांत राठोड व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रविण मुंडे यांच्याशी संपर्क साधून तात्काळ आवश्यक सूचना दिल्या.
त्यानुसार एसडीआरएफच्या पथकाच्या साह्याने बोटीने विद्युत विभाग, वैद्यकीय पथक राहेगाव येथे पोहोचले. विद्युत विभागाच्या कर्मचारी यांनी गावात तीन दिवसापासून बंद असलेल्या विद्युत पुरवठा सुरू केला. तसेच वैद्यकीय पथकाने 102 रुग्णाची तपासणी करून औषधोपचार केले. महावितरणचे सहाय्यक अभियंता पी.पी. साखरे, वरिष्ठ तंत्रज्ञ तिरमले, पतंगे यांनी विद्युत पुरवठा सुरळीत केला. वैद्यकीय विभागाचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. विवेक पदमने, डॉ. शेख हसन , आरोग्य सेविका शैख मुमताज, आरोग्य सेवक शैलेश वाघमारे, आरोग्य कर्मचारी बाळू घोडजकर यांनी वैद्यकीय सेवा दिली.
सदरील मोहीम यशस्वी करण्यासाठी वाजेगाव व तुप्पा महसूल मंडळाचे मंडळ अधिकारी प्रमोद बडवणे, ग्राम महसूल अधिकारी गौतम पांढरे, राहेगावचे सरपंच विलास पाटील इंगळे, पोलीस पाटील प्रतिनिधी संजय पाटील इंगळे, किकीचे पोलीस पाटील गोविंद तेलंगे, आशाताई सुमित्रा इंगळे यांनी योगदान दिले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis