अमरावती, 30 सप्टेंबर (हिं.स.) :शहरातील स्वच्छतेसाठी मनपातर्फे नियमितपणे सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाते. मात्र, अनेक वेळा त्यांच्या दुर्लक्षामुळे शहरातील काही महत्वाच्या ठिकाणी स्वच्छतेचा संपूर्ण बोजवारा उडालेला दिसतो. असाच प्रकार नागरिकांना इर्विन चौकातील ट्राफिक चौकी परिसरात पाहायला मिळतो. येथे दररोज फिरस्ते व परिसरातील बेघर लोक कचरा पसरवत असल्याने, चौकात ड्युटीवर तैनात असलेल्या वाहतूक पोलिसांना रोजच्या कामकाजात त्रास सहन करावा लागतो. इर्विन रुग्णालयाच्या जवळच या चौकात नुकतीच ट्राफिक चौकी उभारण्यात आली आहे, जिथून वाहतूक पोलिस वाहतूक नियंत्रणाचे काम करतात. मात्र, या चौकीच्या आजूबाजूचा परिसर कचऱ्याने व दुर्गंधीने भरलेला आहे.
घुमंतू लोकांकडून सर्वाधिक त्रास
इर्विन रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांकडून, बेघर व घुमंतू लोकांकडून चौकी परिसरातच रात्री व पहाटे उघड्यावर शौच व लघुशंका केली जाते. त्यामुळे चौकीमध्ये बसणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना प्रचंड दुर्गंधीचा सामना करावा लागतो.कधी कधी ही दुर्गंधी इतकी तीव्र असते की, पावसातसुद्धा कर्मचाऱ्यांना चौकीबाहेर उभं राहावं लागतं. पावसामुळे परिसरात अधिकच दुर्गंधी पसरते, तसेच आसपास वाढलेल्या झुडपांमुळे कीटक व पतंग फिरत असल्याने धोक्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.वाहतूक कर्मचाऱ्यांच्या मते, मनपाने या परिसराची दररोज स्वच्छता करावी अशी नितांत गरज आहे. अन्यथा अशा परिस्थितीत कर्मचाऱ्यांना आरोग्याच्या जोखमीवर ड्युटी पार पाडावी लागत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी