
- मनसेच्या इशाऱ्यानंतर कार्यवाही- बावनकुळेंकडून कारवाईचे संकेत
बदलापूर, 10 जानेवारी (हिं.स.) - येथील बाल लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी आणि बदलापूर-कुळगाव नगरपालिकेतील भाजपाचे स्वीकृत नगरसेवक तुषार आपटे यांनी आपल्या स्वीकृत नगरसेवक पदाचा राजीनामा दिला आहे. पक्षाच्या आदेशानंतर वरिष्ठांकडे त्यांनी आपला राजीनामा दिला. विशेष म्हणजे, कालच कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेच्या कार्यकारणी बैठकीत आपटे यांना स्वीकृत नगरसेवक पदावर नियुक्त करण्यात आले होते. त्यानंतर, समाजातून तीव्र प्रतिक्रिया येत होत्या, तर भाजपाने तुषार आपटे याच्या स्वीकृत नगरसेवकपदाचा तातडीने राजीनामा घेतला नाही तर येत्या 13 किंवा 14 जानेवारीला मनसे बदलापूरमध्ये मोर्चा काढेल आणि आंदोलन करेल, असा इशारा अविनाश जाधव यांनी दिला होता. वाढता विरोध लक्षात घेत तुषार आपटेंनी आपला राजीनामा दिला आहे.
बदलापूर बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी तुषार आपटेंसह आरोपी आहेत, सध्या ते जामिनावर बाहेर आहेत. मात्र, आरोपी असताना त्यांना स्वीकृत नगरसेवक पद दिल्याने राजकीय वर्तुळात संताप व्यक्त करत पदावरून हकालपट्टी करण्याची मागणी जोर धरू लागली होती. त्यानंतर, पक्षाची बदनामी होत असल्याने तुषार आपटे यांनी स्वतःच राजीनामा दिला आहे.
राजीनामापत्रात त्यांनी म्हटले आहे की, महोदय, मी विनंतीपूर्वक अर्ज करतो की, माझी कुळगाव-बदलापूर नगरपरिषद स्वीकृत सदस्य / नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली होती, मी आज, 10 जानेवारी 2026 रोजी या पदाचा स्वखुशीने राजीनामा देत आहे, माझा राजीनामा स्वीकारावा ही विनंती, असा आशय तुषार आपटेंनी राजीनामापत्रात दिला आहे.
यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांनी म्हटले की, लैंगिक अत्याचाराबद्दल भाजपाने बक्षीस दिलाय का?
दरम्यान या प्रकरणावर महसूल मंत्री आणि भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी जालन्यात माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. त्यांच्यावर योग्य कारवाई होईल. ज्यांनी ज्यांनी चूक केली त्यांच्यावर कारवाई होत असते. निष्पक्षपणे कारवाई होईल, चिंता करण्याची गरज नाही, अशी प्रतिक्रिया दिली.
भाजपाचा हा निर्णय दुर्दैवी असल्याचं मत मुंबई प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी आज मांडलं. तर, बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातल्या सह-आरोपीला स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी देऊन भाजपानं असंवेदनशीलतेचा कळस गाठला असून, आपलं प्राधान्य कशाला आहे, हे दाखवून दिल्याची टीका
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकारी अध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी केली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनीही या निर्णयावरून भाजपावर निशाणा साधला आहे. कुटुंबातल्या मुली सुरक्षित ठेवायच्या असतील तर भाजपाला मतदान करू नका, असं आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी या प्रकरणावरुन केलं आहे.
बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणाची तक्रार दाखल न केल्याबद्दल संबंधित शाळा व्यवस्थापनाविरोधात गुन्हा दाखल झाला होता. या घटनेनंतर ४४ दिवसांनी संस्थेचे तत्कालीन सचिव आपटे यांना अटक करण्यात आली आणि ४८ तासांत त्यांना जामीन मंजूर झाला. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी