भारत तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गावर - पंतप्रधान
गांधीनगर, 11 जानेवारी (हिं.स.)।“भारताकडून जगाच्या अपेक्षा सातत्याने वाढत आहेत आणि आज भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी मोठी अर्थव्यवस्था आहे”, असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. ते रविवारी राजकोट येथे आयोजित ‘व्हायब्रंट गुजरात’ प्
भारत तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गावर- पंतप्रधान मोदी


गांधीनगर, 11 जानेवारी (हिं.स.)।“भारताकडून जगाच्या अपेक्षा सातत्याने वाढत आहेत आणि आज भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी मोठी अर्थव्यवस्था आहे”, असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. ते रविवारी राजकोट येथे आयोजित ‘व्हायब्रंट गुजरात’ प्रादेशिक परिषदेचे उद्घाटन करत उपस्थितांना संबोधित करताना बोलत होते.पंतप्रधान मोदी सध्या तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत.

पंतप्रधान म्हणाले, “२०२६ च्या सुरुवातीनंतरचा हा माझा गुजरातमधील पहिला दौरा आहे. तोही सुखद आहे, कारण २०२६ मधील माझी ही यात्रा सोमनाथ दादांच्या चरणी मस्तक टेकवून सुरू झाली आणि आता मी राजकोटमधील या भव्य कार्यक्रमात सहभागी होत आहे. म्हणजेच ‘विकासही, वारसाही’ हा मंत्र सर्वत्र घुमत आहे.” त्यांनी सांगितले की २१व्या शतकाचा एक चतुर्थांश काळ संपला असून, या काळात भारताने वेगवान प्रगती केली आहे. या प्रगतीत गुजरात आणि येथील जनतेचा मोठा वाटा आहे. भारत वेगाने जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वाटचाल करत असून, उपलब्ध आकडेवारीवरून भारताकडून जगाच्या अपेक्षा वाढत असल्याचे स्पष्ट होते. आज भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी तिसरी मोठी अर्थव्यवस्था आहे, असे त्यांनी नमूद केले.

पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की देशात महागाई नियंत्रणात आहे आणि कृषी उत्पादनाने नवे विक्रम प्रस्थापित केले आहेत. दूध उत्पादनात भारत जगात प्रथम क्रमांकावर आहे. तसेच जेनेरिक औषधे आणि लसींच्या उत्पादनातही भारत जागतिक पातळीवर आघाडीवर आहे. भारताच्या विकासयात्रेचा आढावा घेताना त्यांनी सांगितले की गेल्या ११ वर्षांत भारत जगातील सर्वात मोठा मोबाइल डेटा वापरकर्ता बनला आहे. यूपीआय (UPI) हे आज जगातील क्रमांक एकचे रिअल-टाइम डिजिटल व्यवहार मंच आहे. यासोबतच भारत जगातील दुसरा सर्वात मोठा मोबाइल उत्पादन करणारा देश बनला आहे. ते पुढे म्हणाले की, भारताकडे आता जगातील तिसऱ्या क्रमांकाचे स्टार्टअप इकोसिस्टम आहे. एव्हिएशन क्षेत्रात भारत तिसरा सर्वात मोठा बाजार बनला आहे, तर मेट्रो नेटवर्कच्या विस्ताराच्या बाबतीतही भारत जगातील अव्वल तीन देशांमध्ये सामील झाला आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, सौराष्ट्र आणि कच्छ हे गुजरातचे असे भाग आहेत, जे आपल्याला शिकवतात की आव्हान कितीही मोठे असले तरी प्रामाणिकपणे आणि कष्टाने काम केले, तर यश निश्चित मिळते. हेच ते कच्छ आहे, ज्याने या शतकाच्या सुरुवातीला भीषण भूकंपाचा सामना केला होता. हेच ते सौराष्ट्र आहे, जिथे अनेक वर्षे दुष्काळ नेहमीचा झाला होता. महिलांना आणि मुलींना पिण्याच्या पाण्यासाठी मैलोनमैल चालावे लागायचे. वीजेची विश्वासार्ह सोय नव्हती. पण काळ बदलतो आणि खरोखर बदलतो. सौराष्ट्र आणि कच्छच्या लोकांनी आपल्या कष्टांनी आपले नशीब बदलले आहे. आज सौराष्ट्र आणि कच्छ केवळ संधींचे क्षेत्र न राहता, भारताच्या प्रगतीचा मजबूत पाया बनले आहेत.

पंतप्रधानांनी पुढे सांगितले की सौराष्ट्र आणि कच्छ हे भारताच्या हरित विकासाचे, हरित गतिशीलतेचे आणि ऊर्जा सुरक्षेचे मोठे केंद्र बनत आहेत. कच्छमध्ये ३० गीगावॅट क्षमतेचा नवीकरणीय ऊर्जा प्रकल्प उभारला जात असून, तो जगातील सर्वात मोठा हायब्रिड रिन्यूएबल एनर्जी पार्क ठरणार आहे. हा प्रकल्प पॅरिस शहरापेक्षा पाच पट मोठा असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे या भागात स्वच्छ ऊर्जेची बांधिलकी आणि व्यावसायिक स्तरावरील वास्तवता दोन्ही दिसून येतात. हरित हायड्रोजनच्या क्षमतेबाबत बोलताना त्यांनी सांगितले की भारतात या दिशेने अभूतपूर्व वेगाने आणि मोठ्या प्रमाणावर काम सुरू आहे. कच्छ आणि जामनगर हे हरित हायड्रोजन उत्पादनाची मोठी केंद्रे म्हणून विकसित होत आहेत. तसेच कच्छमध्ये एक भव्य बॅटरी ऊर्जा साठवण प्रणालीही उभारली जात आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले की आजचा भारत ‘विकसित भारत’ या उद्दिष्टाच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे आणि या उद्दिष्टाच्या पूर्ततेत ‘रिफॉर्म एक्सप्रेस’ची मोठी भूमिका आहे. रिफॉर्म एक्सप्रेस म्हणजे प्रत्येक क्षेत्रात नेक्स्ट-जनरेशन सुधारणा. काही काळापूर्वीच देशात नेक्स्ट-जनरेशन जीएसटी सुधारणा लागू करण्यात आल्या असून त्याचा सकारात्मक परिणाम सर्व क्षेत्रांवर दिसत आहे. विमा क्षेत्रात मोठ्या सुधारणा करण्यात आल्या आहेत. जवळपास सहा दशकांनंतर आयकर कायद्याचे आधुनिकीकरण करण्यात आले असून, त्याचा कोट्यवधी करदात्यांना लाभ झाला आहे. तसेच ऐतिहासिक कामगार सुधारणा लागू करण्यात आल्या असून, त्याचा फायदा कामगार आणि उद्योग दोघांनाही होत आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले, “मी ही गोष्ट खूप काळापासून सांगतो आहे—जर तुम्ही उशीर केला, तर मला दोष देऊ नका. सौराष्ट्र-कच्छमध्ये केलेली प्रत्येक गुंतवणूक गुजरात आणि देशाच्या विकासात योगदान देईल.” त्यांनी रवांडाचे उदाहरण देताना सांगितले की, रवांडाला २०० गिर गायी भेट म्हणून देण्यात आल्या होत्या. त्या गायींमुळे स्थानिक ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळाली. नियमानुसार पहिला वासरू परत देण्यात येतो आणि तो दुसऱ्या कुटुंबाला दिला जातो. अशा प्रकारे २०० गायींपासून सुरू झालेला हा उपक्रम हजारो कुटुंबांपर्यंत पोहोचला असून, रवांडाच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी ताकद मिळाली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande