
गांधीनगर , 11 जानेवारी (हिं.स.)।रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी गुजरातबाबत मोठी घोषणा केली आहे. रिलायन्स पुढील पाच वर्षांत गुजरातमधील आपली गुंतवणूक दुप्पट करून ७ लाख कोटी रुपयांपर्यंत नेईल, असे त्यांनी सांगितले. यासोबतच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे भरभरून कौतुक केले.
रविवारी कच्छ आणि सौराष्ट्रसाठी आयोजित ‘व्हायब्रंट गुजरात’ प्रादेशिक परिषदेतील भाषणात मुकेश अंबानी म्हणाले की, रिलायन्स ही आधीच गुजरातमधील सर्वात मोठी गुंतवणूकदार कंपनी आहे. गेल्या पाच वर्षांत कंपनीने ३.५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली असून, येत्या पाच वर्षांत ही गुंतवणूक वाढवून ७ लाख कोटी रुपये केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. या गुंतवणुकीमुळे मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होईल, लोकांच्या उपजीविकेच्या संधी वाढतील आणि देशात संपत्ती निर्माण होईल, असे अंबानी म्हणाले. ही गुंतवणूक प्रत्येक गुजराती आणि प्रत्येक भारतीयासाठी लाभदायक ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करताना अंबानी म्हणाले की, त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने आत्मविश्वास आणि जागतिक ओळख मिळवली आहे. राजकोट येथे पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत बोलताना त्यांनी सांगितले की, स्वातंत्र्योत्तर भारताच्या इतिहासात इतका आत्मविश्वास आणि ऊर्जा यापूर्वी कधीही पाहायला मिळाली नव्हती. अंबानी म्हणाले, “इतिहासात नोंद होईल की मोदी युगात भारत संभावनांपासून प्रत्यक्ष कामगिरीकडे, स्वप्नांपासून कृतीकडे आणि अनुयायी देशापासून जागतिक शक्तीकडे वाटचाल करू लागला.”
जागतिक परिस्थिती आणि भू-राजकीय तणावांचा उल्लेख करताना अंबानी म्हणाले की, भारत बाह्य संकटांपासून सुरक्षित आहे. “भारतासाठी सर्वात मोठा दिलासा म्हणजे आपल्याकडे एक अजेय सुरक्षा भिंत आहे—नरेंद्रभाई मोदी,” असे त्यांनी सांगितले. अंबानी यांनी गुजरातला रिलायन्सची ओळख असल्याचे सांगितले. “रिलायन्ससाठी गुजरात ही केवळ एक जागा नाही. गुजरात हे आमचे शरीर, हृदय आणि आत्मा आहे. आम्ही एक गुजराती कंपनी आहोत,” असे ते म्हणाले.
मुकेश अंबानी यांनी २०३६ च्या ऑलिम्पिक स्पर्धा अहमदाबादमध्ये आयोजित करण्याच्या पंतप्रधानांच्या दृष्टीकोनाला पाठिंबा दर्शवला. त्यांनी सांगितले की रिलायन्स फाउंडेशन गुजरात सरकारच्या सहकार्याने नारणपुरा येथील वीर सावरकर मल्टी-स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे व्यवस्थापन करेल. हा क्रीडा संकुल राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांसह भारताच्या भावी खेळाडूंच्या प्रशिक्षणाचे केंद्र बनेल, असे अंबानी म्हणाले.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी कच्छ आणि सौराष्ट्रसाठी आयोजित ‘व्हायब्रंट गुजरात’ प्रादेशिक परिषदेचे उद्घाटन केले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि उपमुख्यमंत्री हर्ष संघवीही उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode