राष्ट्रवादीचे पुणेकरांसाठी संयुक्त हमीपत्र - मोफत मेट्रो, मोफत बस, स्वच्छता, वैद्यकीय सुविधा
पुण्याची दिशा बदलण्याचा हा संकल्प - अजित पवार पुणे, 10 जानेवारी (हिं.स.) - पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खा. सुप्रियासुळेयांच्याप्रमुखउपस्थितीत अष्टसूत्री प्रगतीची,
पुणे राष्ट्रवादी जाहीरनामा


पुण्याची दिशा बदलण्याचा हा संकल्प - अजित पवार

पुणे, 10 जानेवारी (हिं.स.) - पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खा. सुप्रियासुळेयांच्याप्रमुखउपस्थितीत अष्टसूत्री प्रगतीची, अष्टावधानी नेतृत्वाची पुण्यासाठी हमीपत्र अशा आशयाने जाहीरनामा सादर करण्यात आला. या जाहीरनाम्यात पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांसाठी विविध विकासकामांची योजना मांडण्यात आली आहे. यावेळी खा. अमोल कोल्हे हेही उपस्थित होते. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, शहरातील दैनंदिन प्रवास अधिक सोयीस्कर आणि किफायतशीर करण्यासाठी मोफत मेट्रो आणि पीएमपीएमएल बस सेवा उपलब्ध करण्याचे ठरले आहे. याशिवाय, १५० आधुनिक शाळा उभारण्याचेही उद्दिष्ट जाहीर करण्यात आले.

या योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना मेट्रो आणि बसचा प्रवास विनामूल्य मिळेल. यामुळे कुटुंबांच्या आर्थिक ओझ्यात घट होईल, शाळा आणि नोकरीच्या ठिकाणी जाणे सुलभ होईल. सार्वजनिक वाहतुकीला चालना मिळून खासगी वाहनांवरची अवलंबित्व कमी होईल, ज्यामुळे रस्त्यांवरची गर्दी आणि वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत मिळेल. मेट्रोच्या शेवटच्या टप्प्यात कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी फीडर बस सेवाही मजबूत करण्यात येईल, असे अजित पवार म्हणाले.

अजित पवार म्हणाले की, आज मी नेता म्हणून नाही, तर पुणेकर म्हणून बोलत आहे. कारण जिथं आपलेपणा असतो, तिथं कारणं दिली जात नाहीत. तिथं जबाबदारी घेतली जाते. गेल्या सहा महिन्यांत वॉर्डनिहाय सर्वेक्षण, पुणेकरांशी थेट संवाद आणि त्यांच्या रोजच्या समस्या समजून घेत हा ठोस वचनांचा जाहीरनामा तयार करण्यात आला आहे.

जाहीरनाम्यातील प्रमुख मुद्दे

या जाहीरनाम्याचा पाया ‘पाच कामं – पक्का वादा’ आहे. दररोज नळाद्वारे, पुरेशा दाबासह पाणीपुरवठा. टँकर माफियांवर अवलंबून राहण्याची वेळ नागरिकांवर येणार नाही. पाण्याची गळती थांबवून पाईपलाईन उन्नतीकरण आणि वेळेत दुरुस्त्या करणार. रस्ते आणि वाहतूक व्यवस्थेत आमूलाग्र बदल करणार. मिसिंग लिंक प्रकल्प आणि विकास आराखड्यातील रस्ते ठराविक कालमर्यादेत पूर्ण करणार. नव्यानं समाविष्ट गावांमध्येही शहर मानकांनुसार रस्ते उभारणार. पुणे खड्डेमुक्त शहर करणार. खड्डे बुजवण्यासाठी कंत्राटदाराला वेळेची मर्यादा राहणार. कामाकडे दुर्लक्ष केल्यास दंड आणि संबंधित कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकणार. टिकाऊ रस्ते उभारण्याची जबाबदारी कंत्राटदाराची राहणार. स्वच्छता आणि सांडपाणी व्यवस्थापन कामकाज नीट होणार. आज निर्माण होणाऱ्या 980 MLD सांडपाण्यापैकी प्रक्रिया क्षमतेतील तफावत भरून काढत नद्यांमध्ये जाणारं प्रदूषण थांबवणार. स्वच्छता ही मोहीम नव्हे, तर दररोजच्या कामातील व्यवस्था बनणार. आरोग्यसेवा सुलभ आणि परवडणारी होणार. वॉर्ड निहाय दवाखाने, सुधारित व नवीन रुग्णालये, खाटांची वाढ, मातृसेवा, कर्करोग उपचार, बर्न वॉर्ड, ICU, टेलिमेडिसिन आणि गरीबांसाठी विमा सहाय्य सेवा उपलब्ध राहणार. विकास हा पर्यावरणाचं नुकसान करून होणार नाही. नाले, ओढे, ड्रेनेज स्वच्छ करणं आणि हरित क्षेत्रांचं संरक्षण करणं, अतिक्रमण रोखणं, पूर व प्रदूषणावर दीर्घकालीन उपाय करणं, पर्यावरणाशी समतोल राखणं हाच विकासाचा खरा मार्ग आहे. व्यवस्था करताना सन्मान आणि स्थैर्य महत्त्वाचं आहे. पुनर्वसन सन्मानानं झालं पाहिजे. उपजीविकेचं संरक्षण केलं गेलं पाहिजे. दैनंदिन जीवन सुलभ करण्यासाठी मोफत PMPML बस प्रवास, मोफत मेट्रो प्रवास, छोट्या घरांसाठी शून्य मालमत्ता कर सवलत आणि शिक्षण थांबू नये म्हणून मोफत टॅब्लेट्स दिले जाणार. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आणि कौशल्य प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या महिलांना 5 लाख रुपयांपर्यंत व्याजमुक्त कर्ज, स्वाभिमानानं उपजीविकेसाठी सहाय्य केलं जाणार. शिक्षण हा पाया आहे. म्हणूनच 150 “पुणे मॉडेल स्कूल” उभारणार. जागतिक दर्जाचं सार्वजनिक शिक्षण, आधुनिक पायाभूत सुविधा आणि गुणवत्तेची हमी देणार. आज 90% विद्यार्थी ऑनलाईन शिकू इच्छितात, त्यामुळे डिजिटल शिक्षणासाठी मोफत टॅब्लेट्स अत्यावश्यक आहेत.

हा जाहीरनामा पुढील पाच वर्षांसाठी आहे. पूर्वी दिलेल्या जबाबदाऱ्या जशा पूर्ण केल्या, तसाच पुण्याची दिशा बदलण्याचा हा संकल्प आहे. हा जाहीरनामा कौतुकासाठी नाही, मोजमापासाठी आहे. दररोज पाणी नाही, रस्ते खराब झाले, आरोग्यसेवा मिळाली नाही किंवा प्रदूषण वाढलं, तर आम्हाला जाब विचारा. ही जबाबदारी आम्ही स्वीकारतो. मी हा जाहीरनामा वचन देणारा म्हणून नाही, तर जबाबदारी स्वीकारणारा पुणेकर म्हणून पुण्यासमोर ठेवला आहे, असे अजित पवार म्हणाले.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande