
नवी दिल्ली, 10 जानेवारी (हिं.स.) : युद्ध म्हणजे फक्त रक्तपात किंवा हिंसाचार नाही, तर ते राष्ट्राच्या इच्छाशक्तीसाठी लढले जाते. आम्ही विकृत नाही, आम्हाला शत्रूचे मृतदेह किंवा कापलेले अवयव पाहून समाधान मिळत नाही. परंतु, युद्धे शत्रुचे मनोधैर्य खचवण्यासाठी लढली जातात, जेणेकरून तो आपल्यापुढे शरण येईल असे प्रतिपादन देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी केले. ते आज, शनिवारी विकसित भारत यंग लीडर्स डायलॉगच्या उद्घाटन समारंभात बोलत होते.
यावेळी डोभाल म्हणाले की, इच्छाशक्ती वाढवणे हे राष्ट्रीय शक्तीचे मूळ आहे. जर देश शक्तिशाली असला, पण मनोबल नसेल, तर सर्व काही निरुपयोगी ठरते. मनोबल टिकवण्यासाठी नेतृत्व आवश्यक आहे, त्यांनी अधोरेखित केले.अजित डोभाल यांनी भारताच्या स्वातंत्र्याच्या इतिहासावर प्रकाश टाकला आणि तरुणांना प्रेरित केले की आपल्या देशाचा गौरवशाली इतिहास आणि संस्कृती टिकवणे हे प्रत्येकाची जबाबदारी आहे. ते म्हणाले की आपल्या पूर्वजांनी स्वातंत्र्यासाठी मोठे बलिदान दिले, अपमान सहन केला, आणि अनेकांनी आपले प्राणही दिले. हा इतिहास आपल्याला आव्हान देतो की प्रत्येक तरुणाच्या मनात एक आग असली पाहिजे, त्यांनी नमूद केले.
त्यांनी बदला या शब्दाचा अर्थ राष्ट्रीय गौरवासाठी घेतला, आणि सांगितले की आज भारताला त्याच्या हक्क, विश्वास, आणि विचारांवर आधारित महान स्थानावर परत आणण्याची आवश्यकता आहे. डोभाल यांनी भारताच्या सांस्कृतिक इतिहासाचा उल्लेख करत सांगितले की भारतीय संस्कृतीने कधीही दुसऱ्यांवर हल्ला केला नाही; पण संरक्षण आणि धोके ओळखण्यात अपयश आले.
पंतप्रधान कार्यालयाच्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 जानेवारी रोजी भारत मंडपम येथे आयोजित विकसित भारत यंग लीडर्स डायलॉगमध्ये देश-विदेशातून आलेल्या 3,000 हून अधिक तरुणांशी संवाद साधणार आहेत. या डायलॉगमध्ये सहभागी तरुण पंतप्रधानांसमोर 10 वेगवेगळ्या विषयांवर आपली सादरीकरणे देतील, ज्यातून देशासाठी उपयुक्त विचार मांडले जातील.
-------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी