हिंद की चादर : श्री गुरु तेग बहादूर साहिबजी – त्याग आणि बलिदानाची अमर गाथा
मानवतेच्या इतिहासात काही अशी व्यक्तिमत्त्वे होऊन गेली, ज्यांनी केवळ स्वतःच्या धर्मासाठी नव्हे, तर दुसऱ्यांच्या धार्मिक स्वातंत्र्यासाठी आणि मानवाधिकारांसाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. शिखांचे नववे गुरु, श्री गुरु तेग बहादूर साहिबजी हे त्यापैकीच ए
हिंद की चादर: श्री गुरु तेग बहादूर साहिबजी – त्याग आणि बलिदानाची अमर गाथा


मानवतेच्या इतिहासात काही अशी व्यक्तिमत्त्वे होऊन गेली, ज्यांनी केवळ स्वतःच्या धर्मासाठी नव्हे, तर दुसऱ्यांच्या धार्मिक स्वातंत्र्यासाठी आणि मानवाधिकारांसाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. शिखांचे नववे गुरु, श्री गुरु तेग बहादूर साहिबजी हे त्यापैकीच एक महान युगपुरुष आहेत. त्यांच्या ३५० व्या शहिदी समागम कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांच्या अतुलनीय बलिदानाचे स्मरण करणे, हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे. हिंद की चादर श्री गुरु तेग बहादुर यांच्या ३५० व्या शहिदी समागम शताब्दी वर्षानिमित्त राज्यातील नांदेड, नागपूर व नवी मुंबई, जि. ठाणे येथे राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभाग व हिंद की चादर श्री गुरु तेग बहादुर साहिब जी ३५० वी शहिदी समागम शताब्दी राज्यस्तरीय समिती, शीख- सिकलीकर, बंजारा लबाना, मोहियाल, सिंधी व इतर सर्व समाज यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.

श्री गुरु तेग बहादुर हे शिख धर्माचे ९ वे गुरू होते, त्यांना हिंद की चादर म्हणून ओळखले जाते. श्री गुरु तेग बहादुर यांनी शिख धर्मात प्रार्थना, परोपकार, सेवा, साधेपणा, इतरांच्या सेवेला महत्‍त्व आणि निर्भीडपणा यांचा प्रचार केला, त्यांचे प्रवचन व भजन यांचा गुरु ग्रंथ साहिब यामध्ये देखील समावेश आहे. श्री गुरु तेग बहादुर यांनी १७ व्या शतकामध्ये तत्कालीन शासनकर्त्यांच्या अन्याय व अत्याचाराविरूद्ध आवाज उठवून धर्मस्वातंत्र्य आणि मानवी हक्कांसाठी बलिदान देऊन भारताच्या सांस्कृतिक व आध्यात्मिक अस्मितेचे रक्षण केले. त्यांच्या बलिदानामुळे संपूर्ण भारतात तसेच शिख धर्मात शौर्य आणि त्यागाची परंपरा अधिक मजबूत झाली. मुघल सम्राटांच्या विरोधात जाऊन भाई लकीशा बंजारा यांनी नववे गुरु तेग बहादूर यांच्या पवित्र शरीरास आपला तांडा व घर जाळून अग्नी दिला. या बाबीस भारतीय इतिहासात अनन्य साधारण महत्‍त्व आहे.

'हिंद की चादर' उपाधीचा अर्थ

गुरु तेग बहादूर यांना 'हिंद की चादर' (भारताची ढाल) असे आदराने संबोधले जाते. जेव्हा मुघल शासकाच्या अत्याचाराने सीमा ओलांडली होती आणि बळजबरीने धर्मांतर सुरू होते, तेव्हा गुरुजींनी निधड्या छातीने उभे राहून भारतीय संस्कृतीचे रक्षण केले.

अतुलनीय बलिदान आणि धैर्य

गुरुजींना आणि त्यांच्या अनुयायांना दिल्लीत कैद करण्यात आले. त्यांना धर्मांतरासाठी प्रचंड मानसिक आणि शारीरिक त्रास देण्यात आला. गुरुजींचे मनोधैर्य खचवण्यासाठी त्यांच्या डोळ्यांदेखत त्यांच्या तीन प्रिय शिष्यांना क्रूरपणे शहीद करण्यात आले. तरीही, गुरु तेग बहादूर जी आपल्या तत्त्वांवर ठाम राहिले. शेवटी, ११ नोव्हेंबर १६७५ रोजी दिल्लीतील चांदणी चौकात (आजचे शीशगंज साहिब) त्यांनी शीश दिले, पण आपला धर्म आणि तत्त्व (सार) सोडले नाही.

गुरुजींची शिकवण: निर्भयता

गुरु तेग बहादूर यांची शिकवण आजही तितकीच प्रासंगिक आहे. त्यांनी संदेश दिला:

भै काहू को देत नहि, नहि भै मानत आन (अर्थात: ना कोणाला भीती दाखवा, ना कोणापासून घाबरा.)

त्यांचे बलिदान हे केवळ एका धर्मापुरते मर्यादित नव्हते, तर ते धार्मिक स्वातंत्र्य, मानवाधिकार आणि अन्यायाविरुद्ध लढण्याचे प्रतीक होते.

३५० व्या शहिदी दिनाचे महत्त्व

आज जेव्हा आपण त्यांचा ३५० वा शहिदी दिवस साजरा करत आहोत, तेव्हा आपण केवळ एका ऐतिहासिक घटनेची आठवण काढत नाही आहोत, तर त्या विचारांना नमन करत आहोत, ज्यांनी भारताचा आत्मा जिवंत ठेवला. आजच्या समाजात जेव्हा द्वेष आणि असहिष्णुता डोकं वर काढते, तेव्हा गुरु तेग बहादूर साहिबजींचा त्याग आपल्याला आठवण करून देतो की, दुसऱ्यांच्या हक्कांचे रक्षण करणे, हाच खरा धर्म आहे.

- प्रशांत कुसुम आनंदराव सातपुते

जिल्हा माहिती अधिकारी, रत्नागिरी

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande