
बीड, 13 जानेवारी, (हिं.स.)। बीड शहरातील अंकुश नगर भागात दिवसाढवळ्या झालेल्या हर्षद शिंदे यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. चार दिवसांपासून फरार असलेल्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखा आणि शिवाजी नगर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत ताब्यात घेतले. या कारवाईमुळे शहरात खळबळ उडवून देणाऱ्या या गुन्ह्याचा छडा लागला आहे.
हर्षद तुळशीराम शिंदे (वय ३८) हे नगरपालिकेत कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत होते. अंकुश नगर परिसरात पाईपलाईनचे काम सुरू असताना आरोपीने त्यांच्यावर हल्ला केला. आरोपीने सुरुवातीला हर्षद शिंदे यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या, मात्र त्या हर्षदला लागल्या नाहीत. आपला जीव वाचवण्यासाठी हर्षद तिथून पळू लागले असता, आरोपीने त्यांचा पाठलाग केला आणि निर्घृणपणे त्यांची हत्या केली. या थरारक घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला होता.
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस प्रशासनाने आरोपीच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखेची दोन आणि शिवाजी नगर पोलिसांचे एक पथक तैनात केले होते. आरोपी कळंबहून केजच्या दिशेने दुचाकीवरून येत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचला आणि आरोपी याच्या मुसक्या आवळल्या.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा आणि शिवाजी नगर पोलीस ठाण्याच्या पथकाने केली आहे. आरोपीला पुढील तपासासाठी शिवाजी नगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. हत्येचे नेमके कारण अद्याप समोर आले नसून, पोलीस चौकशीनंतर यामागील सत्य उघड होण्याची शक्यता आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अधिकारी करत आहेत.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis