
सोलापूर, 13 जानेवारी, (हिं.स.)। बेकायदा गर्भलिंग निदान व गर्भपात प्रकरणी पोलिस उपअधीक्षक अशोक सायकर यांच्या नेतृत्वातील पथकाने आणखी तिघांना अटक केली आहे. गुन्ह्यातील संशयित आरोपींची संख्या आता सहावर पोचली आहे. रात्री अटक केलेल्या संशयितांना बार्शी सत्र न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली आहे. त्यात वैरागचा डॉक्टर, उंदरगावचा फार्मासिस्ट व बार्शीतील परिचारिका (नर्सचाही सहभाग)असल्याचे उघड झाले आहे.
बार्शी तालुक्यातील जामगाव हद्दीत वाणेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याजवळ एका शेताच्या कच्च्या रस्त्यावर अजित सुरेश मस्तूद (रा. रोपळे, ता. माढा) हा एका चारचाकीसमवेत सापडला. त्या गाडीत गर्भलिंग निदान व बेकायदेशीर गर्भपाताची मशिन व साहित्य होते. यापूर्वी या गुन्ह्यात अजित मस्तूद याच्यासह गर्भपाताच्या गोळ्या पुरवणारा नरेंद्र जगन्नाथ भगत (वय ४३, रा. आनंदनगर, अकलूज) आणि डॉ. अकबर रशीद मुलाणी (वय ४५, रा. शिक्षक कॉलनी, केज जि. बीड) यांना अटक झाली आहे.तसेच वैरागमधील मॅक्सकेअर हॉस्पिटल चालवणारा डॉ. प्रवीण भाऊसाहेब मासाळ (वय ३३, रा. मानेगाव ता. बार्शी) याला देखील पोलिसांनी अटक केली आहे. याच्या रुग्णालयात गर्भपात करीत होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड