
सोलापूर, 13 जानेवारी (हिं.स.)। सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी धडाकेबाज कामगिरी केली आहे. दोन गावठी पिस्तूल विक्रीसाठी घेऊन आलेल्या तीन जणांना अटक करून आठ काडतूसे व मोटार सायकल असा २ लाख १६ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे अशी माहिती पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सोलापूर महानगर पालिका निवडणूक २०२५ चे अनुषंगाने सोलापूर शहरामध्ये अवैध शस्त्र/अग्नीशस्त्राचा वापर करून घडणाऱ्या गुन्ह्यांना प्रतिबंध करणेबाबत पोलीस आयुक्तांनी शहर गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना विशेष मोहिम घेवून कारवाई करणेसंदर्भात मार्गदर्शन करून सुचना दिल्या होत्या.
त्याअनुषंगाने दिनांक ११ जानेवारी रोजी गुन्हे शाखेकडील पोलीस हवालदार संताजी रोकडे व पोलीस शिपाई भारत पाटील यांना गोपनिय बातमीदारामार्फत खात्रीशीर बातमी मिळाली की, ” डी. आर. एम. रेल्वे ऑफिसचे बाजुस असलेल्या रेल्वे कॉलनीचे वॉल कंपाऊंडलगत मोकळया जागेत तीन इसम हे त्यांचेकडील काळया रंगाचे युनिकॉर्न मोटारसायकलवर थांबले असुन त्यांचेकडे देशी बनावटीचे पिस्टल आहेत. प्राप्त बातमीबाबत शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांना सविस्तर माहिती देवून वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेकडील स.पो.नि. दत्तात्रय काळे व त्यांचे तपास पथक असे प्राप्त माहितीचे आधारे त्या ठिकाणी गेले असता त्यांना तेथे एक काळया रंगाची युनीकॉर्न मोटारसायकलवर ३ इसम संशयास्पदस्थीतीत थांबल्याचे दिसून आले. स.पो.नि. दत्तात्रय काळे व त्यांचे तपास पथकाने या इसमांना शिताफिने जागीच ताब्यात घेतले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड