
मुंबई, 13 जानेवारी (हिं.स.) । देशांतर्गत शेअर बाजारात आज प्रारंभीच्या व्यवहारादरम्यान घसरणीचा कल दिसून आला. बाजाराची सुरुवात मजबुतीने झाली होती; खरेदीच्या जोरावर सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांकांमध्ये वाढ झाली, मात्र ही वाढ टिकाऊ ठरली नाही. काही वेळानंतरच विक्रीचा दबाव वाढल्याने दोन्ही निर्देशांक लाल निशाणावर उतरले.
सकाळी 10 वाजेपर्यंतच्या व्यवहारानंतर सेन्सेक्स 0.29% कमी होऊन 83,633.73 अंकांवर आणि निफ्टी 0.32% नी घसरून 25,707.25 अंकांवर व्यवहार करत होते.
याच कालावधीत, ओएनजीसी, हिंदाल्को इंडस्ट्रीज, स्टेट बँक ऑफ इंडिया, टेक महिंद्रा आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स या दिग्गज शेअर्समध्ये 0.19% ते 2.11% वाढ दिसून आली, तर लार्सन अँड टुब्रो, एचसीएल टेक्नॉलॉजी, ट्रेंट लिमिटेड, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीज या शेअर्समध्ये 1.20% ते 2.39% घट झाली.
संपूर्ण बाजारात 2,561 शेअर्समध्ये सक्रिय व्यवहार सुरू होते; यापैकी 1,593 शेअर्स नफा कमावत हिरव्या निशाणावर, तर 968 शेअर्स लाल निशाणावर होते. सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 5 शेअर्स हिरव्या निशाणावर टिकले, तर 25 शेअर्स लाल निशाणावर होते. निफ्टीमधील 50 शेअर्सपैकी 12 शेअर्स हिरव्या आणि 38 शेअर्स लाल निशाणावर व्यवहार करत होते.
बीएसई सेन्सेक्स आज 201.15 अंकांच्या वाढीसह 84,079.32 अंकांवर उघडला, मात्र खरेदीच्या सुरुवातीच्या उडीनंतर विक्रीचा दबाव वाढल्याने हा निर्देशांक 83,578.56 अंकांपर्यंत घसरला. एनएसई निफ्टीने 107.10 अंक वाढून 25,897.35 अंकांवर व्यवहार सुरू केला, परंतु विक्रीमुळे तो 25,700.85 अंकांपर्यंत खाली आला.मागील व्यवहार दिवशी, सोमवारी सेन्सेक्स 301.93 अंक (0.36%) आणि निफ्टी 106.95 अंक (0.42%) वाढीसह बंद झाले होते.
--------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule