
मुंबई, 13 जानेवारी (हिं.स.)। टाटा मोटर्सने भारतात 2026 टाटा पंच फेसलिफ्ट अधिकृतपणे लॉन्च केली असून ही रिफ्रेश्ड कॉम्पॅक्ट एसयूव्ही सब-4 मीटर सेगमेंटमधील लोकप्रिय मॉडेलचा अपडेटेड अवतार म्हणून उपलब्ध झाली आहे. या गाडीची किंमत ५.५९ लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होतात. अपडेटेड स्टाइलिंग, नवीन फीचर्स, दमदार इंजिन पर्याय आणि विस्तारित व्हेरिएंट्समुळे ही गाडी खरेदीदारांसाठी अधिक आकर्षक ठरते आहे. सुरक्षेच्या बाबतीत पंचला आधीच 5-स्टार रेटिंग मिळाले असून फेसलिफ्टनंतर ती अधिक प्रीमियम आणि टेक्नॉलॉजी-रिच बनली आहे.
पंच फेसलिफ्टमध्ये टाटाच्या 1.2-लिटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिनसोबतच नवीन 1.2-लिटर टर्बो-पेट्रोल इंजिनचा पर्याय देण्यात आला आहे. नॅचरली एस्पिरेटेड व्हर्जन दैनंदिन वापर आणि इंधन कार्यक्षमतेसाठी योग्य ठरत असताना टर्बो व्हर्जन अधिक पॉवर, जलद थ्रॉटल रिस्पॉन्स आणि उत्साही ड्रायव्हिंग अनुभव प्रदान करते. दोन्ही इंजिन्स मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह तसेच सीएनजी पर्यायासह उपलब्ध राहणार असून ग्राहकांना परफॉर्मन्स आणि इंधन बचत यामधील संतुलित निवड करण्याची संधी मिळणार आहे.
डिझाइनच्या दृष्टीनेही गाडीला मोठे अपडेट मिळाले असून समोरच्या भागात नवीन एलईडी हेडलॅम्प्स, पियानो ब्लॅक फिनिश, रीडिझाइन केलेली लोअर ग्रिल आणि नवीन स्किड प्लेट्स देण्यात आल्या आहेत. मागील भागात नवीन एलईडी टेललॅम्प्स आणि बंपरमुळे गाडी अधिक दणकट आणि मॉडर्न दिसते. कलर पॅलेटमध्येही बदल करत सायंटॅफिक ब्ल्यू, कॅरमेल येलो, बंगाल रूज रेड, डेटोना ग्रे, कूर्ग क्लाउड्स सिल्व्हर आणि प्रिस्टीन व्हाइट असे नवीन आकर्षक रंग पर्याय देण्यात आले आहेत.
इंटीरियरमध्ये ट्विन-स्पोक स्टीयरिंग व्हीलवर इल्यूमिनेटेड टाटा लोगो, टॉगल-स्टाइल स्विचेस, रीशेप्ड एसी व्हेंट्स आणि 7 इंच टीएफटी इन्स्ट्रुमेंट क्लस्टरमुळे कॅबिन अधिक प्रीमियम आणि आधुनिक भासते. अपग्रेडेड इन्फोटेनमेंट सिस्टममध्ये मोठा टचस्क्रीन, वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्ले, प्रीमियम साउंड सिस्टमचा समावेश आहे. सुरक्षेसाठी स्टँडर्ड 6 एअरबॅग्स, 360-डिग्री कॅमेरा आणि अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर-असिस्टन्स फीचर्स देण्यात आले आहेत.
नवीन पंच फेसलिफ्ट स्मार्ट, प्युअर, प्युअर+, अॅडव्हेंचर, अॅकॉम्प्लिश्ड आणि अॅकॉम्प्लिश्ड+ एस अशा सहा व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध असून बेस व्हेरिएंटमध्ये आवश्यक वैशिष्ट्ये तर टॉप व्हेरिएंट्समध्ये प्रीमियम फीचर्स आणि सनरूफसारखे पर्याय मिळतात. दमदार इंजिन पर्याय, आकर्षक डिझाइन, प्रीमियम इंटीरियर आणि आधुनिक तंत्रज्ञानासह 2026 टाटा पंच फेसलिफ्ट हुंडई एक्स्टर, मारुती फ्रॉन्क्स आणि निसान मॅग्नाइट यांसारख्या प्रतिस्पर्ध्यांना कडवी टक्कर देण्यास सज्ज झाली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule