अशोक लेलँडतर्फे लखनऊ येथे ग्रीनफिल्ड कारखान्याचे उद्घाटन
लखनऊ, 13 जानेवारी (हिं.स.)। हिंदुजा समूहाची प्रमुख भारतीय कंपनी आणि देशातील आघाडीची व्यावसायिक वाहन उत्पादक कंपनी असलेल्या अशोक लेलँडने आज उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे हरित दळणवळणावर लक्ष केंद्रित करणाऱ्या आपल्या नवीन, एकात्मिक व्यावसायिक वाहन उत्पाद
Ashok Leyland Greenfield factory  Lucknow


लखनऊ, 13 जानेवारी (हिं.स.)। हिंदुजा समूहाची प्रमुख भारतीय कंपनी आणि देशातील आघाडीची व्यावसायिक वाहन उत्पादक कंपनी असलेल्या अशोक लेलँडने आज उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे हरित दळणवळणावर लक्ष केंद्रित करणाऱ्या आपल्या नवीन, एकात्मिक व्यावसायिक वाहन उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन केले. या प्रकल्पाचे उद्घाटन आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि भारत सरकारचे अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्या हस्ते करण्यात आले.

जागतिक दर्जाची गुणवत्ता व कार्यक्षमतेत उत्कृष्टता सादर करत लखनऊ विमानतळाजवळील सरोजिनी नगर औद्योगिक क्षेत्रात वसलेला आणि 70 एकरांहून अधिक क्षेत्रफळात पसरलेला हा नवीन प्रकल्प जागतिक स्तरावर अशोक लेलँडचा सर्वात प्रगत आणि शाश्वत प्रकल्प म्हणून ओळखला जातो. या प्रकल्पाचा मुख्य भर इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादनावर असेल. हा प्रकल्प दरवर्षी 5000 वाहनांचे उत्पादन करण्यासाठी डिझाइन करण्यात आला आहे. येथील बहुतेक कर्मचारी उत्तर प्रदेशचे रहिवासी असून कार्यशक्तीतील महिलांची टक्केवारीही लक्षणीय आहे.

अशोक लेलँडचे अध्यक्ष धीरज हिंदुजा म्हणाले, “या नवीन प्रकल्पाचे उद्घाटन उत्तर प्रदेश या गतिमान राज्यात अशोक लेलँडसाठी एका महत्त्वपूर्ण नव्या अध्यायाची सुरुवात झाल्याचे दर्शवते. आर्थिक विकासाला चालना देणाऱ्या, अर्थपूर्ण रोजगारनिर्मिती करणाऱ्या आणि या प्रदेशात दीर्घकालीन समृद्धी निर्माण करणाऱ्या संधी खुल्या करण्यास आमचा समूह पूर्णपणे कटिबद्ध आहे. हा उत्पादन प्रकल्प भारताच्या व्यावसायिक वाहन उद्योगाच्या भविष्यास आकार देण्याच्या आमच्या निर्धाराला पुन्हा एकदा बळकटी देतो. शाश्वत दळणवळणाला पुढे नेत हा प्रकल्प रोजगारनिर्मितीत महत्त्वपूर्ण योगदान देईल असा आम्हाला विश्वास आहे. या नवीन प्रकल्पासह आम्ही भविष्यासाठी स्वतःला तयार करत असून, आमच्या नेट झिरो उत्सर्जन उद्दिष्टांच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकत आहोत.”

अशोक लेलँडचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी शेनू अगरवाल म्हणाले, “अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि उच्च पातळीच्या स्वयंचलनाने सुसज्ज असलेला हा प्रकल्प जागतिक दर्जाची गुणवत्ता व नाविन्यपूर्णता यांवरील आमचा भर अधोरेखित करतो. इलेक्ट्रिक बसवर विशेष लक्ष केंद्रित करत हा प्रकल्प भारतासाठी स्वच्छ आणि भविष्यासाठी सज्ज अशा दळणवळण परिसंस्थेच्या उभारणीसाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे.”

अशोक लेलँडचा हा नवीन लखनऊ प्रकल्प स्थानिक कार्यबलासाठी कौशल्य विकास आणि रोजगारनिर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. हरित प्रकल्प म्हणून डिझाइन केलेल्या या सुविधेमध्ये छतावरील सौर पॅनल्स, ऊर्जा-कार्यक्षम एलईडी प्रकाशयोजना, बॅटरीवर चालणारी अंतर्गत लॉजिस्टिक्स प्रणाली, अधिकाधिक जलसंतुलन उपक्रम आणि झिरो-डिस्चार्ज प्रणालीचा समावेश आहे. त्यातून शाश्वत उत्पादनाबाबत कंपनीची वचनबद्धता अधिक बळकट होते.

इलेक्ट्रिक वाहनांचा अवलंब करण्यात उत्तर प्रदेश राज्य आघाडीवर येत असताना या नवीन प्रकल्पातून राज्याच्या हरित दळणवळण दृष्टीकोनाला पुढे नेण्यासाठी असलेली अशोक लेलँडची दीर्घकालीन बांधिलकी अधोरेखित होते. यामुळे राज्य आणि देशासाठी स्वच्छ, अधिक कार्यक्षम आणि भविष्यासाठी सज्ज अशा दळणवळण परिसंस्थेच्या उभारणीत अशोक लेलँड एक प्रमुख कंपनी म्हणून अग्रणी स्थानावर असताना शाश्वत वाहतुकीतील कंपनीचे नेतृत्व अधिक मजबूत होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande