सीए कुट्टप्पा यांची भारतीय पुरुष बॉक्सिंग संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती
नवी दिल्ली, 14 जानेवारी (हिं.स.)द्रोणाचार्य पुरस्कार विजेते सीए कुट्टप्पा यांची पुन्हा एकदा भारतीय पुरुष बॉक्सिंग संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. हा त्यांचा तिसरा कार्यकाळ असेल. भारतीय बॉक्सिंग फेडरेशन (बीएफआय) ने या नियुक्ती
बॉक्सिंग प्रतिकात्मक फोटो


नवी दिल्ली, 14 जानेवारी (हिं.स.)द्रोणाचार्य पुरस्कार विजेते सीए कुट्टप्पा यांची पुन्हा एकदा भारतीय पुरुष बॉक्सिंग संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. हा त्यांचा तिसरा कार्यकाळ असेल. भारतीय बॉक्सिंग फेडरेशन (बीएफआय) ने या नियुक्तीची माहिती दिली. सीए कुट्टप्पा यांनी या पदावर एसएआय रोहतकचे प्रशिक्षक धर्मेंद्र यादव यांची जागा घेतली आहे. पण धर्मेंद्र यादव पुरुष संघाच्या प्रशिक्षक स्टाफचा भाग राहतील. बीएफआयचे कार्यकारी संचालक कर्नल अरुण मलिक यांनी या बदलाची घोषणा केली.

गेल्या काही वर्षांत भारतीय पुरुष बॉक्सिंग संघाची कामगिरी अपेक्षेनुसार राहिलेली नाही. २०२४ च्या पॅरिस ऑलिंपिकसाठी फक्त दोन बॉक्सर पात्र ठरले होते. त्यानंतर, १२ वर्षांत प्रथमच २०२५ च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत (लिव्हरपूल) भारतीय पुरुष संघ पदकाशिवाय परतला.

सीए कुट्टप्पा यांनी यापूर्वी टोकियो आणि पॅरिस ऑलिंपिक दरम्यान भारतीय पुरुष संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहिले आहे. २००८ च्या बीजिंग ऑलिंपिकमध्ये ते राष्ट्रीय सपोर्ट स्टाफचा भाग होते. जेव्हा विजेंदर सिंगने बॉक्सिंगमध्ये भारताचे पहिले ऑलिंपिक पदक जिंकले होते.

गेल्या महिन्यात महिला संघाचे परदेशी प्रशिक्षक म्हणून नियुक्त झालेले माजी हाय परफॉर्मन्स डायरेक्टर सॅंटियागो निवा या शिबिरात सामील झाले आहेत. एसएआयच्या गीता चानू महिला बॉक्सिंग संघाच्या प्रभारी प्रशिक्षक म्हणून जबाबदारी स्वीकारतील. भारतीय बॉक्सर्स १२ जानेवारीपासून पटियाला येथील नेताजी सुभाष नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स (एनआयएस) येथे प्रशिक्षण घेत आहेत. हे शिबिर १४ मार्चपर्यंत चालेल, जिथे ते राष्ट्रीय कोचिंग आणि सपोर्ट स्टाफच्या देखरेखीखाली सराव करतील. बीएफआयच्या २०२६ च्या निवड धोरणानुसार, राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत ऑलिंपिक वजन श्रेणीतील अव्वल चार बॉक्सर्सना शिबिरात समाविष्ट करण्यात आले आहे. ऑलिंपिक नसलेल्या वजन श्रेणीतील सुवर्ण आणि रौप्य पदक विजेत्यांनाही संधी देण्यात आली आहे.

दुखापतीमुळे राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होऊ न शकलेल्या ५७ किलो वजनी गटातील जागतिक विजेत्या जास्मिन लांबोरिया आणि ६० किलो वजनी गटातील विश्वचषक अंतिम फेरीतील सुवर्णपदक विजेत्या परवीन हुडा यांना वाइल्डकार्डद्वारे शिबिरात समाविष्ट केले जाईल. पदक फेरी गाठू न शकलेल्या परंतु आंतरराष्ट्रीय क्षमता दाखविणाऱ्या काही बॉक्सर्सनाही शिबिरात वाइल्डकार्ड प्रवेश दिला जाईल. २०२६ हे वर्ष भारतीय बॉक्सिंगसाठी महत्त्वाचे वर्ष असेल, ज्यामध्ये आशियाई चॅम्पियनशिप, राष्ट्रकुल खेळ आणि आशियाई खेळ यासारख्या प्रमुख स्पर्धा होणार आहेत. भारतीय बॉक्सर्ससाठी वर्षातील पहिली आंतरराष्ट्रीय स्पर्धा बॉक्सम आंतरराष्ट्रीय स्पर्धा असणार आहे. २ फेब्रुवारीपासून स्पेनमधील ला नुसिया येथे ही स्पर्धा सुरू होईल.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande