
नवी दिल्ली, 14 जानेवारी (हिं.स.) : उत्तर भारतात, विशेषतः दिल्ली-एनसीआरमध्ये, तीव्र शीतलहरीसह दाट धुक्याचा मोठा परिणाम दिसून येत आहे. अनेक भागांत आज, बुधवारी दृश्यमानता (व्हिजिबिलिटी) शून्य नोंदवली गेली. त्यामुळे रस्ते, रेल्वे आणि हवाई वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. हवामान विभागाच्या माहितीनुसार पंजाब आणि हरियाणामध्ये शीतलहर कायम आहे. नव्या पश्चिमी विक्षोभामुळे 16 ते 19 जानेवारीदरम्यान पाऊस व बर्फवृष्टीची शक्यता असून, थंडी मात्र कायम राहणार आहे.
सध्या संपूर्ण उत्तर भारत भीषण थंडी आणि दाट धुक्याच्या तडाख्यात आहे. भारतीय हवामान विभागानुसार (आयएमडी) बुधवारी, १४ जानेवारी रोजी दिल्ली-एनसीआर, पंजाब, हरियाणा, पश्चिम उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये दाट ते अतिदाट धुके पसरले होते, ज्यामुळे दैनंदिन जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले.सकाळच्या वेळेत अनेक ठिकाणी परिस्थिती अत्यंत गंभीर होती. पंजाबच्या अमृतसर, अंबाला, पंतनगर आणि उधमपूर येथे दृश्यमानता शून्य मीटर नोंदवली गेली. लुधियाना, हिसार, करनाल आणि भिवानी येथे दृश्यमानता 20 मीटरपेक्षाही कमी होती. ओडिशाच्या राउरकेला येथेही दाट धुके असून, तेथे सुमारे 100 मीटर दृश्यमानता नोंदवली गेली. दाट धुक्यामुळे रस्ते, रेल्वे आणि हवाई सेवांवर मोठा परिणाम झाला असून, अनेक गाड्या व विमानांना विलंब झाला.आयएमडीनुसार पंजाब आणि हरियाणातील अनेक भागांत शीतलहर ते तीव्र शीतलहरीची परिस्थिती कायम आहे. उत्तराखंडमधील काही भागांत “कोल्ड डे”ची स्थिती असून जमिनीवर दवबिंदू गोठल्याची (पाला) नोंद झाली आहे.
जम्मू-काश्मीर-लडाख आणि हिमाचल प्रदेशातील अनेक भागांत किमान तापमान शून्याखाली गेले आहे. पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान आणि पश्चिम उत्तर प्रदेशातील अनेक भागांत किमान तापमान 1 ते 5 अंशादरम्यान नोंदवले गेले. संपूर्ण उत्तर-पश्चिम भारतात तापमान सामान्यपेक्षा 3 ते 6 अंशाने कमी आहे.हवामान विभागाच्या माहितीनुसार सध्या हिमाचल प्रदेशावर एक सक्रिय पश्चिमी विक्षोभ आहे. यासोबतच वरच्या स्तरात चक्री वाऱ्यांचे परिसंचरण आणि वेगवान सब-ट्रॉपिकल वेस्टरली जेट वारे कार्यरत आहेत.याशिवाय 15 जानेवारीच्या रात्रीपासून आणखी एक नवीन पश्चिमी विक्षोभ पश्चिम हिमालयीन भागावर परिणाम करणार आहे. 16 ते 19 जानेवारीदरम्यान जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची व हिमवृष्टीची शक्यता आहे. 18 व 19 जानेवारी रोजी पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि पश्चिम उत्तर प्रदेशातही हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागाने सांगितले की गुरुवारपासून दिल्ली-एनसीआरसह उत्तर-पश्चिम भारतातील मैदानी भागांवर या नव्या पश्चिमी विक्षोभाचा परिणाम दिसून येईल. आगामी 19 जानेवारीपर्यंत आकाशात अंशतः ढगांची ये-जा राहील आणि या काळात तापमानात किंचित वाढ होऊ शकते.मात्र, पुढील काही दिवस उत्तर भारतातील अनेक भागांत दाट धुके आणि तीव्र थंडी कायम राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी सकाळ-संध्याकाळ अनावश्यक प्रवास टाळावा आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
----------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी