
नवी दिल्ली, 13 जानेवारी (हिं.स.) । शक्सगाम खोऱ्यावर पुन्हा एकदा दावा मांडत चीनने भारतासोबतचा तणाव वाढवला असून, भारत सरकारने हा दावा ठामपणे फेटाळला आहे. शक्सगाम खोरे हे भारताचे अविभाज्य अंग असल्याचे स्पष्ट करत भारताने या भागातील चिनी पायाभूत सुविधा प्रकल्पांवर तीव्र आक्षेप नोंदवला आहे.
जम्मू-काश्मीर आणि लडाख हे भारताचे अविभाज्य भाग असून, या प्रदेशांबाबत कोणतेही आधारहीन नकाशात्मक दावे भारत मान्य करणार नाही, असे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. चीनने शक्सगाम खोऱ्यात सुरू केलेल्या पायाभूत प्रकल्पांवर भारताने केलेल्या टीकेनंतर काही दिवसांतच बीजिंगकडून हे वक्तव्य समोर आले आहे. शक्सगाम खोरे, ज्याला ट्रान्स-काराकोरम ट्रॅक्ट असेही म्हटले जाते, हे चीनच्या शिनजियांग प्रांताच्या सीमेवर, काराकोरम पर्वतरांगेच्या उत्तरेस आणि वादग्रस्त सियाचिन-अक्साई चिन क्षेत्राजवळ स्थित आहे. हे क्षेत्र तथाकथित पाकिस्तान-अधिकृत काश्मीरमधील हुंजा-गिलगित भागात मोडते.चीन–पाकिस्तान यांच्यात 1963 मध्ये झालेल्या तथाकथित सीमा कराराअंतर्गत पाकिस्तानने भारताच्या शक्सगाम खोऱ्यातील सुमारे 5,180 चौरस किलोमीटर भूभाग चीनकडे हस्तांतरित केला होता. भारताने हा करार सुरुवातीपासूनच गैरकायदेशीर, अवैध व अन्याय्य ठरवला असून, त्याला कधीही मान्यता दिलेली नाही.
या मुद्द्यावर प्रतिक्रिया देताना चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या माओ निंग यांनी, “आपण ज्या प्रदेशाचा उल्लेख करत आहात तो चीनचा भाग असल्याचा दावा केला. चीन आपल्या हद्दीत पायाभूत सुविधा उभारत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैसवाल यांनी चीनचा दावा फेटाळताना सांगितले, “शक्सगाम खोरे हे भारतीय भूभाग आहे. 1963 मधील तथाकथित चीन–पाकिस्तान सीमा करार आम्हाला मान्य नाही. तो पूर्णपणे बेकायदेशीर आहे. भारतीय भूभागातून जाणाऱ्या तथाकथित चीन–पाकिस्तान आर्थिक कॉरिडोरला (सीपीईसी) भारताचा ठाम विरोध आहे, कारण त्या भागावर पाकिस्तानने बळजबरीने आणि बेकायदेशीर ताबा मिळवला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चीनने शक्सगाम खोऱ्यातून जाणाऱ्या सर्वहवामान रस्त्याच्या बांधकामाला सुरुवात केली आहे. हा रस्ता जगातील सर्वात उंच युद्धक्षेत्र मानल्या जाणाऱ्या सियाचिन हिमनद्येपासून 49 किलोमीटरपेक्षा कमी अंतरावर असल्याचे सांगितले जाते. 2017 मधील डोकलाम संघर्षानंतर या भागातील चिनी बांधकाम गतीमान झाल्याचेही निदर्शनास आले आहे.तथापि, या हालचालींमुळे भारताच्या संरक्षणात्मक स्थितीवर कोणताही परिणाम होणार नाही, असा विश्वास संरक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. भारताने या क्षेत्रातील चीन आणि पाकिस्तानच्या हालचालींवर सातत्याने लक्ष ठेवले असून, आपल्या सार्वभौमत्वाच्या रक्षणासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलण्याची तयारी दर्शवली आहे.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी