इराण–अमेरिकेतील तणाव वाढला; दोन्ही देशांमधील थेट संपर्क पूर्णपणे खंडित
वॉशिंग्टन , 14 जानेवारी (हिं.स.)। इराण आणि अमेरिकेमधील तणाव मोठ्या प्रमाणात वाढला असून, त्यामुळे दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांमधील थेट संपर्क तुटला आहे. माहितीनुसार, इराणचे परराष्ट्र मंत्री सैयद अब्बास अराघची आणि अमेरिकेचे विशेष दूत स्टीव विटकोफ यांच
इराण –अमेरिकेतील तणाव वाढला; दोन्ही देशांमधील थेट संपर्क पूर्णपणे खंडित


वॉशिंग्टन , 14 जानेवारी (हिं.स.)। इराण आणि अमेरिकेमधील तणाव मोठ्या प्रमाणात वाढला असून, त्यामुळे दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांमधील थेट संपर्क तुटला आहे. माहितीनुसार, इराणचे परराष्ट्र मंत्री सैयद अब्बास अराघची आणि अमेरिकेचे विशेष दूत स्टीव विटकोफ यांच्यातील संवाद पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.

इराणमध्ये सुरू असलेल्या आंदोलनांवर होत असलेल्या कठोर कारवाईच्या पार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हस्तक्षेपाच्या दिलेल्या धमक्यांनंतर हा अहवाल समोर आला आहे. तेहरानने इशारा दिला आहे की, जर इराणवर हल्ला झाला तर तो परिसरातील अमेरिकेच्या लष्करी तळांवर प्रत्युत्तरात्मक कारवाई करेल.

युरोपीय देश आणि इस्रायलसोबत मिळून अमेरिका गेल्या सुमारे एका वर्षापासून इराणच्या अणुकार्यक्रमावर करार करण्याचा प्रयत्न करत होती. मात्र, इराणी अधिकाऱ्यांनी संकेत दिले आहेत की वाढलेल्या तणावामुळे कोणतीही प्रगती होण्याची शक्यता संपुष्टात आली आहे. अमेरिकेच्या धमक्यांमुळे राजनैतिक प्रयत्न कमकुवत झाले असून, दशके जुना अणु-विवाद सोडवण्यासाठी होऊ शकणाऱ्या संभाव्य बैठका रद्द करण्यात आल्या आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ट्रम्प यांनी इराणमधील आंदोलनकर्त्यांच्या समर्थनार्थ वारंवार हस्तक्षेपाची धमकी दिली आहे. एका इराणी अधिकाऱ्याने बुधवार (14 जानेवारी 2026) रोजी सांगितले की, तेहरानने अमेरिकन सैन्याला मदत करणाऱ्या शेजारी देशांना इशारा दिला असून, वॉशिंग्टनने हल्ला केल्यास अमेरिकन तळांवर हल्ले केले जातील. अहवालानुसार, मध्यपूर्वेतील एका प्रमुख अमेरिकन विमानतळावरून काही कर्मचाऱ्यांना तेथून बाहेर पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणमधील आंदोलनकर्त्यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट करत, “आंदोलन सुरू ठेवा, तुमची मदत येत आहे,” असे म्हटले होते. त्यांनी आंदोलनकर्त्यांना संस्थांवर ताबा मिळवण्याचे आवाहन केले आणि हत्यारे व अत्याचार करणाऱ्यांची नावे नोंदवून ठेवण्यास सांगितले “त्यांना याची मोठी किंमत मोजावी लागेल. आंदोलनकर्त्यांच्या विनाकारण हत्या थांबत नाहीत तोपर्यंत मी इराणी अधिकाऱ्यांशी होणाऱ्या सर्व बैठका रद्द केल्या आहेत,” असेही ट्रंप यांनी स्पष्ट केले होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande