
पुणे, 15 जानेवारी (हिं.स.)।
पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मतदान प्रक्रिया सुरू असताना शिरूर तालुक्याच्या पूर्व भागात एकच खळबळ उडाली आहे. मांडवगण फराटा, तळेगाव ढमढेरे, वडगाव रासाई, इनामगाव, निर्वी, बाभुळसर बुद्रुक, पिंपळसुटी,तांदळी आदी गावांतील अनेक ग्रामस्थांची नावे पुणे महानगरपालिकेच्या मतदारयादीत आढळून आल्याने नागरिकांमध्ये संभ्रम व अस्वस्थता निर्माण झाली आहे.या पार्श्वभूमीवर मांडवगण फराटा व परिसरात बुधवारी मध्यरात्री अज्ञात व्यक्तीच्या वतीने फ्लेक्स लावून दुबार मतदान केल्यास किंवा त्यासाठी वाघोली येथे गेल्यास “रडेस्तोवर चोप देऊन पोलिसी कारवाईला सामोरे जावे लागेल,” असा थेट आणि सज्जड इशारा देण्यात आला आहे.या बॅनरबाजीमुळे संपूर्ण गावासह आसपासच्या परिसरात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
विशेष म्हणजे मांडवगण फराटा ग्रामपंचायत हद्दीतील अनेक मतदारांची नावे ग्रामपंचायत मतदारयादीत असतानाच वाघोली (पुणे महानगरपालिका) मतदारयादीतही नोंद असल्याचा दावा करण्यात येत आहे.मात्र, फ्लेक्सवर केवळ २५ मतदारांचीच नावे प्रसिद्ध करण्यात आल्याने उर्वरित मतदारांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु