‘नोटा नव्हे, उपलब्ध उमेदवारांपैकी सर्वोत्तमाची निवड करा’ – सरसंघचालक
नागपूर, 15 जानेवारी (हिं.स.) : मतदानाच्या वेळी सर्व उमेदवारांना नाकारण्याऐवजी (नोटा) उपलब्ध पर्यायांपैकी योग्य उमेदवाराची निवड करणे अधिक श्रेयस्कर असल्याचे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले. नागपूर महानगरपालिक
डॉ. मोहन भागवत सरसंघचालक


नागपूर, 15 जानेवारी (हिं.स.) : मतदानाच्या वेळी सर्व उमेदवारांना नाकारण्याऐवजी (नोटा) उपलब्ध पर्यायांपैकी योग्य उमेदवाराची निवड करणे अधिक श्रेयस्कर असल्याचे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले. नागपूर महानगरपालिका निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावल्यानंतर ते बोलत होते.

डॉ. मोहन भागवत आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह सुरेश उपाख्य भय्याजी जोशी यांनी गुरुवारी महाल येथील नागपूर नाईट हायस्कूलमधील मतदान केंद्रावर मतदान केले. हे दोघेही मतदानासाठी सर्वप्रथम पोहोचले होते.

मतदानानंतर बोलताना डॉ. भागवत म्हणाले की, ‘नोटा’चा वापर म्हणजे सर्व उमेदवारांना नकार देणे होय, आणि ही लोकशाहीतील सर्वात वाईट स्थिती आहे. असे केल्याने प्रत्यक्षात नको असलेल्या उमेदवारांनाच अप्रत्यक्ष मदत होते. त्याऐवजी उपलब्ध उमेदवारांपैकी योग्य व सर्वोत्तम उमेदवाराची निवड करणे आवश्यक आहे.

लोकशाही व्यवस्थेत मतदान ही अत्यंत महत्त्वाची बाब असून ते प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. जनहिताचा विचार करून मतदान केले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. अराजक म्हणजे राजा नसलेली अवस्था असून ती समाजासाठी घातक ठरते, असा संदर्भ देत महाभारतातही योग्य नेतृत्व निवडीचे महत्त्व अधोरेखित केल्याचे त्यांनी सांगितले.

निवडणूक आयोगाकडून मतदानाबाबत सातत्याने जनजागृती केली जाते आणि त्याचा परिणाम हळूहळू दिसून येईल, असे नमूद करत डॉ. भागवत यांनी पुन्हा एकदा ‘नोटा नव्हे, अव्हेलेबलमधून बेस्ट’ निवडण्याचे आवाहन केले.---------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande