
नवी दिल्ली , 15 जानेवारी (हिं.स.)।सेना दिनानिमित्त गुरुवारी पंतप्रधान, राष्ट्रपती, संरक्षण मंत्री आणि उपराष्ट्रपती यांनी भारतीय नौसेनेच्या शौर्याची, आत्मनिर्भरतेची आणि देशाच्या सुरक्षेत असलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेची प्रशंसा केली. पंतप्रधान मोदी यांनी सांगितले कि, राष्ट्र भारतीय सेनेच्या शौर्याला आणि दृढ बांधिलकीला नमन करतो.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वरील पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणाले, “आपले सैनिक निःस्वार्थ सेवेचे प्रतीक आहेत. ते सर्वात कठीण परिस्थितीतही ठाम निर्धाराने राष्ट्राचे संरक्षण करतात. कर्तव्याप्रती त्यांची निष्ठा संपूर्ण देशात विश्वास आणि कृतज्ञतेची भावना निर्माण करते.” कर्तव्य बजावताना आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्यांना देश गाढ आदराने स्मरतो, असेही मोदी यांनी नमूद केले.
या प्रसंगी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही शुभेच्छा दिल्या. त्या म्हणाल्या, “भारतीय सेना देशाची एकता, सार्वभौमत्व आणि अखंडता जपण्यासाठी सदैव अढळ राहिली आहे. सीमांचे संरक्षण करण्याबरोबरच आपत्ती, संकट आणि मानवीय मदतीच्या वेळीही आमचे सैनिक महत्त्वाची भूमिका बजावतात. ‘राष्ट्र प्रथम’ ही त्यांची अढळ भावना प्रत्येक भारतीयाला सातत्याने प्रेरणा देते.”
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सेना दिनाच्या गौरवशाली निमित्ताने भारतीय सेनेचे वीर जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांना हार्दिक शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, “राष्ट्र त्यांच्या अदम्य साहसाला, सर्वोच्च बलिदानाला आणि भारताच्या सार्वभौमत्व व अखंडतेच्या रक्षणासाठी असलेल्या अढळ बांधिलकीला नमन करते.” सीमांवर सतर्क राहून आणि संकटाच्या वेळी ठामपणे उभे राहणाऱ्या भारतीय सेनेने आपल्या व्यावसायिक कौशल्य, शिस्त आणि मानवीय सेवेच्या माध्यमातून जागतिक स्तरावर सन्मान मिळवला आहे, असे त्यांनी सांगितले. आधुनिक, आत्मनिर्भर आणि भविष्यासाठी सज्ज अशी सेना उभारण्यासाठी सरकार पूर्णपणे कटिबद्ध आहे. कृतज्ञ राष्ट्र अभिमान आणि सन्मानाने आपल्या सैनिकांच्या पाठीशी उभे आहे, असेही त्यांनी नमूद केले.
उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी म्हटले की, “सेना दिनाच्या निमित्ताने मी भारतीय सेनेचे वीर अधिकारी, जवान आणि माजी सैनिकांना नमन करतो. देशाच्या सुरक्षेसाठी त्यांचे अढळ साहस, शिस्त आणि सर्वोच्च बलिदान प्रत्येक नागरिकाला प्रेरणा देते. भारताची एकता आणि अखंडता यासाठी त्यांच्या निःस्वार्थ सेवेचा आणि अडिग बांधिलकीचा आम्ही सन्मान करतो. या पवित्र प्रसंगी कर्तव्यपथावर प्राण अर्पण करणाऱ्या वीर शहीदांना आम्ही गाढ कृतज्ञतेने स्मरतो.”
गृहमंत्री अमित शाह यांनी सेना दिनानिमित्त भारतीय सेनेच्या जवानांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना हार्दिक शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, “त्यांच्या शौर्याचा आवाज आपल्या इतिहासाच्या पानांत नोंदली गेली आहे, जी प्रत्येक पिढीतील भारतीयांच्या मनात देशभक्तीची प्रखर ज्वाला प्रज्वलित करते. कर्तव्यपथावर सर्वस्व अर्पण करणाऱ्या त्या वीर हृदयांना माझे कोटी-कोटी नमन.”
१५ जानेवारी रोजी सेना दिवस साजरा केला जातो. १९४९ साली फील्ड मार्शल के. एम. करियप्पा यांनी आपल्या ब्रिटिश पूर्वसुरी जनरल सर एफ. आर. आर. बुचर यांच्याकडून पदभार स्वीकारून भारतीय सेनेचे पहिले भारतीय कमांडर-इन-चीफ म्हणून जबाबदारी स्वीकारली, त्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode