
भोपाळ, 15 जानेवारी (हिं.स.)।भोपाळच्या बैरसिया परिसरात मकरसंक्रांतीच्या दिवशी पिकअप (लोडिंग वाहन) आणि ट्रॅक्टर-ट्रॉली यांच्यात समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात घडला. या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात दोन्ही वाहनांतील एकूण १२ जण जखमी झाले असून, त्यामध्ये लहान मुलांचाही समावेश आहे.
माहितीनुसार, राजधानी भोपाळच्या ग्रामीण भागातील बैरसिया पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी आणि गुरुवारीच्या मध्यरात्री हा भीषण रस्ते अपघात झाला. या दुर्घटनेत १२ जण जखमी झाले असून, त्यापैकी १० जण लोडिंग वाहनात तर २ जण ट्रॅक्टर-ट्रॉलीमध्ये प्रवास करत होते. काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. लोडिंग वाहनातील सर्व १५ प्रवासी एकाच कुटुंबातील होते आणि मकरसंक्रांतीच्या निमित्ताने गुरुवारी नर्मदापुरम येथे नर्मदा स्नानासाठी जात होते.
या अपघातात लक्ष्मीबाई अहिरवार, बबली बाई, हरि बाई, दीपक आणि मुकेश अहिरवार यांचा मृत्यू झाला आहे. तर अहिरवार कुटुंबातील सूरज, विनिता, पुनीत, मोनिका, महक, नुरी बाई, लल्लू, प्रदीप आणि ज्योती गंभीर जखमी झाले असून यांच्यावर बैरसिया रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच ट्रॅक्टर-ट्रॉलीमध्ये प्रवास करणारे दोन जणही जखमी झाले आहेत.
या घटनेची माहिती मिळताच उशिरा रात्री बैरसिया एसडीएम आशुतोष शर्मा, आमदार विष्णू खत्री, अतिरिक्त पोलीस अधीक्षक नीरज चौरसिया यांच्यासह अन्य वरिष्ठ पोलीस अधिकारी रुग्णालयात पोहोचले आणि जखमींना योग्य उपचार देण्याचे निर्देश दिले. हा अपघात लोडिंग वाहनाच्या अतिवेगामुळे झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, जखमींची प्रकृती स्थिर झाल्यानंतरच त्यांचे जबाब नोंदवले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
बैरसिया पोलीस ठाण्याचे प्रभारी वीरेंद्र सेन यांनी सांगितले की, विदिशा जिल्ह्यातील सिरोंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या अहिरवार कुटुंबातील १५ जण नर्मदापुरमकडे जात होते. श्रद्धाळूंना घेऊन जाणारे लोडिंग वाहन रात्री ठाकूर लाल सिंह शाळेजवळ पोहोचले असता समोरून येणाऱ्या ट्रॅक्टर-ट्रॉलीशी त्याची जोरदार धडक झाली. लोडिंग वाहनाचा वेग जास्त असल्याने ते वाहन पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. या अपघातात लोडिंग वाहनातील पाच जणांचा मृत्यू झाला.वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे अनेक जखमी आणि मृत प्रवासी वाहनात अडकून पडले होते. त्यांना मोठ्या प्रयत्नांनंतर बाहेर काढण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode