
ढाका , 16 जानेवारी (हिं.स.)।बांगलादेशमध्ये हिंदूंविरोधातील हिंसाचार थांबण्याचे नाव घेत नाही. बांगलादेशमध्ये पुन्हा एकदा हिंदूंवर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना सिलहट जिल्ह्यातील गोवाईघाट तालुक्यातील नंदीरगाव संघाच्या बहोर गावातील आहे. येथे एका हिंदू कुटुंबाच्या घरावर इस्लामिक कट्टरपंथ्यांनी हल्ला केला.या घटनेनंतर, परिसरात राहणाऱ्या हिंदू समुदायामध्ये भीती आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.
माहितीनुसार, कट्टरपंथ्यांनी बीरेंद्र कुमार डे यांच्या घराला आग लावली. जे स्थानिक पातळीवर शिक्षक आहेत आणि लोकांमध्ये 'झुनू सर' म्हणून ओळखले जातात.अज्ञात व्यक्तींनी रात्रीच्या वेळी त्यांच्या घराला आग लावली, ज्यामुळे संपूर्ण घर जळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आग इतक्या वेगाने पसरली की घरात उपस्थित असलेल्या कुटुंबीयांना तात्काळ बाहेर पडावे लागले. दिलासादायक बाब म्हणजे या घटनेत कोणाचाही जीव गेला नाही; मात्र घर आणि त्यामधील सर्व सामान पूर्णपणे नष्ट झाले आहे. अद्याप ही आग जाणीवपूर्वक लावण्यात आली की यामागे अन्य कोणता कट होता, हे स्पष्ट झालेले नाही.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यामध्ये घराला लागलेली आग आणि जीव वाचवण्यासाठी पळणारे कुटुंबीय स्पष्टपणे दिसत आहेत. व्हिडिओ समोर आल्यानंतर स्थानिक नागरिक, सामाजिक संस्था आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. या हल्ल्यामुळे बांगलादेशमधील अल्पसंख्यकांच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्थानिक समुदायाचे म्हणणे आहे की अशा घटना सातत्याने वाढत असून, दोषींवर कठोर कारवाई होत नसल्याने हल्लेखोरांचे धाडस वाढत आहे.
गेल्या काही आठवड्यांत बांगलादेशच्या विविध भागांत हिंदू कुटुंबांना लक्ष्य केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. पिरोजपूर जिल्ह्यात डिसेंबरच्या अखेरीस एका हिंदू कुटुंबाचे घर जाळण्यात आले होते, तर चिटगावच्या राऊजान परिसरात स्थलांतरित हिंदू कुटुंबांच्या घरांना आग लावल्याच्या घटनांची नोंद झाली होती. या प्रकरणांमुळे देशभरात अल्पसंख्यकांच्या सुरक्षिततेबाबत चिंता वाढली आहे.
सतत घडणाऱ्या अशा घटनांमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरही चिंता व्यक्त केली जात आहे. मानवाधिकार तज्ज्ञांचे मत आहे की अल्पसंख्यकांच्या सुरक्षेसाठी ठोस पावले उचलली नाहीत, तर परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते. सध्या या प्रकरणात प्रशासन किती वेगाने आणि गांभीर्याने कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode