
तेहरान, 16 जानेवारी (हिं.स.)।इराणमध्ये सुरू असलेल्या आंदोलनांमध्ये अमेरिकेच्या हस्तक्षेपामुळे दोन्ही देशांतील शाब्दिक संघर्ष आता अत्यंत धोकादायक वळणावर पोहोचला आहे. ट्रम्प यांच्या धमक्यांचा इराणवर कोणताही परिणाम होताना दिसत नाही. उलट इराणने थेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाच ठार मारण्याची धमकी दिली आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या नेतृत्वाविरोधात संभाव्य लष्करी कारवाईचा इशारा दिल्यानंतर, इराणच्या सरकारी दूरचित्रवाणीवर एक फुटेज प्रसारित करण्यात आले. या फुटेजमध्ये ट्रम्प यांना ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. पेनसिल्व्हेनियामधील ट्रम्प यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचे छायाचित्र दाखवत फारसी भाषेत “यावेळी निशाणा चुकणार नाही” असे लिहिलेले दिसते.
इराणच्या सरकारी दूरचित्रवाणीवर दाखवलेल्या या फुटेजमध्ये, आंदोलनांदरम्यान मृत्यू पावलेल्या इराणी सुरक्षाकर्मचाऱ्यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमादरम्यान, एक तरुण ट्रम्प यांना धमकी देणारे पोस्टर हातात धरून उभा असल्याचे दिसते. या पोस्टरमध्ये 2024 साली पेनसिल्व्हेनियातील बटलर येथे झालेल्या एका निवडणूक प्रचारसभेत ट्रम्प यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा उल्लेख आहे. त्या हल्ल्यात ट्रम्प थोडक्यात बचावले होते. त्यामुळेच या पोस्टरमध्ये “मागील वेळीप्रमाणे यावेळी निशाणा चुकणार नाही” असा इशाराही देण्यात आला आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे, या फुटेजमध्ये दाखवलेला हल्ला पेनसिल्व्हेनियातील बटलर येथे एका निवडणूक सभेदरम्यान झाला होता. थॉमस क्रूक्स नावाच्या बंदूकधाऱ्याने ट्रम्प यांच्यावर गोळी झाडली होती. सुदैवाने गोळी लक्ष्य चुकली आणि त्यांच्या कानाला स्पर्श करत पुढे गेली.
तेहरानमध्ये अलीकडे झालेल्या आंदोलनांदरम्यान मृत्युमुखी पडलेल्या सुरक्षा दलांच्या 100 हून अधिक सदस्यांसह, अधिकाऱ्यांकडून “शहीद” घोषित करण्यात आलेल्या इतर लोकांच्या अंत्यसंस्कारावेळी हा व्हिडिओ इराणच्या सरकारी दूरचित्रवाणीवर प्रसारित करण्यात आला होता. या समारंभात सहभागी लोकांनी “अमेरिका मुर्दाबाद” असे लिहिलेले फलक हातात धरले होते, तर काही जण सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई यांची छायाचित्रे घेऊन उपस्थित होते.इराणचे नाव यापूर्वीही परदेशात हत्या कटांशी जोडले गेले आहे. जानेवारी 2020 मध्ये इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सच्या कुद्स फोर्सचे प्रमुख जनरल कासिम सुलेमानी यांच्या हत्येचा आदेश दिल्यानंतर, इराणने ट्रम्प यांना ठार मारण्याची अनेकदा शपथ घेतली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode