मारिया कोरीना माचाडो यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना दिले नोबेल शांतता पुरस्काराचे पदक
वॉशिंग्टन , 16 जानेवारी (हिं.स.)।अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अखेर व्हेनेझुएलाच्या विरोधी पक्षनेत्या मारिया कोरीना माचाडो यांच्याकडून नोबेल शांतता पुरस्काराचे पदक मिळाले. व्हाइट हाऊसमध्ये झालेल्या भेटीदरम्यान माचाडो यांनी हे पदक ट्
मारिया कोरीना माचाडो यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना दिले नोबेल शांतता पुरस्काराचे पदक


वॉशिंग्टन , 16 जानेवारी (हिं.स.)।अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अखेर व्हेनेझुएलाच्या विरोधी पक्षनेत्या मारिया कोरीना माचाडो यांच्याकडून नोबेल शांतता पुरस्काराचे पदक मिळाले. व्हाइट हाऊसमध्ये झालेल्या भेटीदरम्यान माचाडो यांनी हे पदक ट्रम्प यांच्याकडे सुपूर्द केले. ट्रम्प यांनी अलीकडच्या काळात व्हेनेझुएलाच्या सत्तासंघर्षाबाबत माचाडो यांना उघडपणे पाठिंबा दिलेला नसल्याने, हा माचाडो यांचा एक महत्त्वाचा राजकीय प्रयत्न मानला जात आहे.

व्हाइट हाऊसमधील भेटीनंतर ट्रम्प यांनी माचाडो यांचे भरभरून कौतुक केले. त्यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘ट्रुथ सोशल’वर लिहिले, “तिने मला तिच्या नोबेल शांतता पुरस्काराचे पदक दिले, हे माझ्यासाठी मोठा सन्मान आहे.” ट्रम्प यांनी माचाडो यांना “खूप चांगली महिला” असे संबोधत, त्यांनी आयुष्यात अनेक अडचणी सहन केल्याचेही सांगितले.

नोबेल संस्थेने स्पष्ट केले आहे की माचाडो आपला नोबेल शांतता पुरस्कार कोणालाही देऊ शकत नाहीत. त्यामुळे हे पदक देणे केवळ एक प्रतीकात्मक पाऊल आहे. तरीही हा प्रकार महत्त्वाचा मानला जात आहे, कारण अलीकडेच ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाच्या राजकारणात माचाडो यांना काहीसे बाजूला सारले आहे. व्हाइट हाऊसच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की ट्रम्प हे पदक स्वतःकडे ठेवू शकतात. उल्लेखनीय म्हणजे, ट्रम्प यांनी दीर्घकाळापासून नोबेल शांतता पुरस्कार मिळवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

व्हाइट हाऊस मधून बाहेर पडल्यानंतर माचाडो यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, “मी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना नोबेल शांतता पुरस्काराचे पदक दिले आहे. आमच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी दिलेल्या विशेष योगदानाची ही ओळख आहे.” यानंतर त्या संसद भवन कॅपिटल हिलकडे रवाना झाल्या.

अलीकडच्या काळात ट्रम्प यांनी व्हेनेझुएलातील लोकशाहीबाबत आपल्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. तेथे निवडणुका कधी होतील, याबाबतही त्यांनी स्पष्ट भूमिका मांडलेली नाही. ट्रम्प यांचे म्हणणे आहे की, माचाडो यांना देशाचे नेतृत्व करणे कठीण जाईल, कारण त्यांना देशांतर्गत पूर्ण पाठिंबा मिळत नाही.माचाडो यांच्या पक्षाने 2024 ची निवडणूक जिंकल्याचा दावा केला जातो, मात्र राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांनी हे निकाल मान्य करण्यास नकार दिला होता. असे असतानाही ट्रम्प यांनी संकेत दिले आहेत की ते कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष डेल्सी रोड्रीगेझ यांच्यासोबत काम करण्यास तयार आहेत. रोड्रीगेझ या मादुरो यांच्या निकटवर्तीय मानल्या जातात.

बंद दरवाजामागे झालेल्या बैठकीनंतर माचाडो व्हाइट हाऊसच्या बाहेर आपल्या समर्थकांना भेटल्या. त्यांनी अनेक समर्थकांना मिठी मारली. त्या म्हणाल्या, “आपण राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यावर विश्वास ठेवू शकतो.” यानंतर काही समर्थकांनी “थँक यू ट्रम्प” अशा घोषणा दिल्या. वॉशिंग्टनला येण्यापूर्वी माचाडो सार्वजनिकरित्या फारशा दिसल्या नव्हत्या. गेल्या महिन्यात त्या नॉर्वेला गेल्या होत्या, जिथे त्यांच्या वतीने त्यांच्या मुलीने नोबेल शांतता पुरस्कार स्वीकारला होता. त्यापूर्वी माचाडो सुमारे 11 महिने व्हेनेझुएलामध्ये लपून राहिल्या होत्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande