अकोल्यात नवनिर्वाचित भाजप नगरसेवकावर भाजपच्याच पराभूत उमेदवाराकडून चाकू हल्ला
अकोला, 17 जानेवारी (हिं.स.)। अकोला महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक दोनमधून भाजपकडून विजयी झालेले उमेदवार शरद श्रीराम तूरकर यांच्यावर पराभूत झालेल्या भाजपच्याच एका उमेदवाराने केलेल्या जीवघेण्या हल्ल्यामुळे अकोला शहरात एकच खळबळ उडाली. भाजप
Photo


अकोला, 17 जानेवारी (हिं.स.)।

अकोला महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक दोनमधून भाजपकडून विजयी झालेले उमेदवार शरद श्रीराम तूरकर यांच्यावर पराभूत झालेल्या भाजपच्याच एका उमेदवाराने केलेल्या जीवघेण्या हल्ल्यामुळे अकोला शहरात एकच खळबळ उडाली. भाजपच्याच नितीन राऊत नामक पराभूत उमेदवाराकडून हा हल्ला करण्यात आल्याची माहिती आहे. या घटनेमुळे केवळ परिसरातच नव्हे तर संपूर्ण शहरात भीतीचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले असून राजकीय वर्तुळातही मोठी चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान पोलिसांनी हस्तक्षेप करीत परिस्थिती नियंत्रणात आणली.

निवडणुकीतील विजयानंतर शरद तूरकर हे कार्यकत्यांसह प्रभागात विजयी रॅली व भेटीगाठी करत असताना अचानक अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांचा वापर केल्याचे सांगितले जात आहे. या हल्ल्यात शरद तूरकर गंभीर जखमी झाले आहेत. घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. यावेळी दोन्ही गटाच्या जमावाकडून वाहनाची तोडफोड करण्यात आली.. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. तर दुसरीकडे या प्रकरणातील आरोपी अद्यापही फरार असल्याची माहिती आहे.

घटनेची माहिती मिळताच तात्काळ त्यांना उपचारासाठी नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तूरकर यांच्यावर तातडीने उपचार सुरू असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र, डॉक्टरांकडून त्यांच्यावर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तसेच अकोट फाईल पोलीस ठाण्याचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसराची पाहणी करून पंचनामा केला असून सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. तसेच प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब नोंदवण्याचे कामही युद्धपातळीवर सुरू आहे. हा हल्ला नेमका कोणत्या कारणातून झाला, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. मात्र, निवडणुकीतील राजकीय वैमनस्य, जुन्या वादातून किंवा वैयक्तिक शत्रुत्वातून हा हल्ला झाला असण्याची शक्यता पोलिसांकडून तपासली जात आहे. सर्व बाजूंनी तपास सुरू असून लवकरच आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे, शरद तूरकर यांनी या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव केला आहे. दरम्यान रुग्णालयात खासदार अनुप धोत्रे यांच्यासह आमदार रणधीर सावरकर यांनी जखमीची विचारपूस केली. या प्रकरणातील आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande