
लातूर, 17 जानेवारी (हिं.स.)। ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिब यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त लातूर जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयांमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करून श्री गुरु तेग बहादुर साहिब यांचा इतिहास विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविला जात आहे. यानिमित्त आज विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये श्री गुरु तेग बहादुर साहिब यांच्या कार्यावर आधारित निबंध लेखन व चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविल्याचे पाहायला मिळाले.
नांदेड येथे २४ व २५ जानेवारी रोजी ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादुर यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त विशेष कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमांची तसेच श्री गुरु तेग बहादुर साहिब यांच्या कार्याची माहिती घरोघरी पोहोचविण्यासाठी शिक्षण विभागामार्फत विशेष जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत शाळा व महाविद्यालयांमध्ये श्री गुरु तेग बहादुर साहिब यांच्या जीवनावर आधारित माहितीपट, गीत दाखविणे यासह विविध स्पर्धांचे आयोजन केले जात आहे.
लातूर जिल्ह्यात शनिवारी सकाळच्या सत्रात विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये प्रभात फेरी काढून ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिब यांच्या कार्याची माहिती तसेच नांदेड येथे आयोजित कार्यक्रमांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आली. श्री गुरु तेग बहादुर साहिब यांच्या कार्याची महती सांगणारी घोषवाक्ये असलेले फलक हाती घेत विद्यार्थ्यांनी या प्रभात फेरीत सहभाग नोंदविला.
विद्यार्थ्यांनी रेखाटला श्री गुरु तेग बहादुर साहिब यांचा जीवनपट
जिल्हा परिषद शाळांसह जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय व खासगी शाळांमध्ये झालेल्या निबंध लेखन व चित्रकला स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. यावेळी विद्यार्थ्यांनी श्री गुरु तेग बहादुर साहिब यांच्या कार्याची महती आपल्या निबंधांमधून मांडून त्यांच्या गौरवशाली इतिहासाला उजाळा दिला. तसेच चित्रकलेतून श्री गुरु तेग बहादुर साहिब यांचे चित्र रेखाटून त्यांचा जीवनपट मांडण्याचा प्रयत्न केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis