
मुंबई, 17 जानेवारी, (हिं.स.)। अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, मुंबई यांच्या मुख्यालयासाठी पनवेल (पश्चिम) येथील भूखंड विशेष बाब म्हणून १ रुपया प्रति चौ.मी. दराने देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची स्थापना कंपनी कायदा अधिनियम, १९५६ अंतर्गत २७.११.१९९८ रोजी करण्यात आली आहे. आर्थिकदृष्टया मागास प्रवर्गातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करणे, उद्योगासाठी अर्थसहाय्य, उद्योग आणि व्यावसायिक क्षेत्रात मराठा समाजाचा सहभाग वाढविणे ही महामंडळाची उद्दिष्टये आहेत.
सध्या महामंडळाचे मुख्यालय छत्रपती शिवाजी महाराज स्थानकाजवळ भाडे तत्त्वावर आहे. त्यामुळे महामंडळास आणखी प्रभावीरित्या कामकाज करता यावे यासाठी महामंडळाच्या मुख्यालय आणि बहुउद्देशीय इमारतीसाठी पनवेल (पश्चिम) येथील सेक्टर १६ मधील सहा हजार चौरस मीटरचा भूखंड देण्यास मंजुरी देण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर