
परभणी, 17 जानेवारी (हिं.स.)। राज्याचे मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्ष यांच्या दौर्यासह जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी मनपा निवडणूकीत अक्षरशः पायाला भिंगरी लावून प्रचार केला खरा परंतु, सर्वसामान्य नागरीकांनी काँग्रेस व शिवसेना उबाठा आघाडीस मोठा कौल दिला. त्यामुळेच आघाडीचा हा मोठा विजय आम्ही जनतेला समर्पित करीत आहोत, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार सुरेशदादा देशमुख यांनी व्यक्त केली.
या निवडणूका भारतीय जनता पार्टीने गांभीर्याने घेतल्या होत्या. राज्याचे मुख्यमंत्री यांचा दौरा, राज्याचे महसुल मंत्री यांचा तीन वेळा दौरा तसेच प्रदेशाध्यक्षांचाही दौरा तसेच या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी पायाला भिंगरी लावून प्रचार केला. परंतु, सर्वसामान्य नागरीकांनी मतदानातूनच आघाडीस कौल दिला. त्यामुळे या सर्वसामान्य नागरीकांचे आम्ही सर्व आघाडीचे नेतेमंडळी निश्चितच आभारी आहोत. त्यांच्या ऋणात राहणार आहोत. या महापालिकेत आघाडीचाच महापौर होणार आहे. विशेषतः लोकांच्या मनातलाच महापौर होईल, आम्ही सर्वजन एकमेकांच्या सोबत आहोत, असे ते म्हणाले. मतदानाच्या टप्प्यात भारतीय जनता पार्टीने एकदा नव्हे, चार-चार वेळा रिकाऊंटींगचा आग्रह धरला, परंतु शेवटी सत्याचाच विजय झाला. लोकशाहीचा विजय झाला, असे ते म्हणाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis