
मुंबई, 17 जानेवारी (हिं.स.)। अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या १ हजार ९०१ पदांच्या आकृतीबंधास आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. त्याचबरोबर अर्थ व सांख्यिकी संचालनालयाचे नाव बदलून अर्थ व सांख्यिकी आयुक्तालय असे करण्यासही मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.
वित्त विभागाने दिलेल्या सूचनेनुसार अर्थ व सांख्यिकी संचालनालयातील कामकाजाचा आणि मंजूर पदांचा आढावा घेण्यात आला. त्यानुसार अर्थ व सांख्यिकी संचालनालयाची ९९६ पदे आणि २१२ वाढीव पदे, जिल्हा नियोजन समित्यांची ५७६ पदे, सहआयुक्त ( नियोजन), विभागीय आयुक्त कार्यालय यांच्या कार्यालयासाठी ६६ पदे, वैधानिक विकास मंडळाची ५१ पदे अशा एकूण १९०१ पदांच्या आकृतीबंधास आज मान्यता देण्यात आली.
त्याचबरोबर मानव विकास कार्यक्रमाकडील ९५ पदांचे अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या कार्यालयात, तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रम कार्यालयाकडील नऊ पदांचे सहआयुक्त (नियोजन) यांच्या कार्यालयात तर नक्षलग्रस्त विशेष कृति आऱाखडा कक्षातील तीन पदांचे जिल्हा नियोजन समितीच्या कार्यालयात समायोजन करण्यासही मान्यता देण्यात आली.
अर्थ व सांख्यिकी संचालनालयाचे नाव बदलून अर्थ व सांख्यिकी आयुक्तालय असे करण्यास मान्यता देण्यात आल्याने त्याअनुषंगाने होणाऱ्या पदनामांतही बदल करण्यास मान्यता देण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर