
मुंबई, 17 जानेवारी (हिं.स.)। महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व नैसर्गिक वारशाचे जतन व संवर्धन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या सहकार्यामुळे (टीसीएस) अधिक प्रभावीपणे होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासगी क्षेत्राला वारसा जतन आणि संवर्धनात सहभागी करून घेण्याच्या धोरणाला चालना दिली आहे. महाराष्ट्रातील ऐतिहासिक स्मारके आणि नैसर्गिक परिसंस्थांच्या संरक्षणात 'टीसीएस' आणि टीसीएस फाउंडेशन सक्रिय भूमिका बजावत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रेरणेतून गेल्या दशकात मुंबईतील ऐतिहासिक राजाबाई क्लॉक टॉवर आणि मुंबई विद्यापीठाच्या ग्रंथालय इमारतीच्या संवर्धन व पुनर्संचयितीकरणाचा महत्त्वपूर्ण प्रकल्प राबवण्यात आला आहे.
मुंबईतील 156 वर्षे जुन्या राजाबाई टॉवरच्या बाह्य प्रकाशव्यवस्थेचे आधुनिकीकरण तसेच ग्रंथालयातील फर्निचरची दुरुस्ती व पुनर्स्थापना या कामांना शासनस्तरावर मिळालेल्या पाठबळामुळे गती मिळाली. या प्रकल्पासाठी 'टीसीएस'ने 8.90 कोटी रुपयांचे योगदान दिले असून, युनेस्कोने 2018 च्या आशिया-पॅसिफिक सांस्कृतिक वारसा संवर्धन पुरस्कारांत या उपक्रमाची दखल घेतली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक-खासगी भागीदारीच्या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय (सीएसएमव्हीएस) यांच्या संवर्धन व पुनर्संचयितीकरणाला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली. 'टीसीएस'ने या प्रकल्पासाठी टप्प्याटप्प्याने एकूण 24.79 कोटी रुपयांचे योगदान दिले. सन 2022 मध्ये युनेस्कोच्या आशिया-पॅसिफिक सांस्कृतिक वारसा संवर्धन पुरस्कारांत ‘अवॉर्ड ऑफ एक्सलन्स’ मिळवणारा हा प्रकल्प वास्तुशास्त्रीय व अभियांत्रिकी दृष्टिकोनातून आदर्श ठरला. गेल्या 100 वर्षांतील हे संग्रहालयाचे पहिले मोठे पुनर्संचयितीकरण कार्य ठरले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर