सत्तेच्या जोरावर नागपूरच्या लोकशाहीचा सौदा - डॉ. नितीन राऊत
नागपूर, 17 जानेवारी (हिं.स.) - नागपूर महानगरपालिकेच्या 151 जागांच्या निवडणूक निकालातून शहराच्या लोकशाहीचा सत्तेच्या जोरावर सौदा करण्यात आल्याचे गंभीर आरोप राज्याचे माजी मंत्री व आमदार डॉ. नितीन राऊत यांनी केले आहे. भाजपला 102 जागांचे बहुमत मिळाले अ
नितीन राऊत


नागपूर, 17 जानेवारी (हिं.स.) - नागपूर महानगरपालिकेच्या 151 जागांच्या निवडणूक निकालातून शहराच्या लोकशाहीचा सत्तेच्या जोरावर सौदा करण्यात आल्याचे गंभीर आरोप राज्याचे माजी मंत्री व आमदार डॉ. नितीन राऊत यांनी केले आहे. भाजपला 102 जागांचे बहुमत मिळाले असले, तरी हा कौल जनतेच्या मूलभूत प्रश्नांवरील विश्वासाचा नसून सत्ता, पैसा आणि प्रशासकीय यंत्रणांच्या गैरवापरातून घडवून आणलेला असल्याचा दावा त्यांनी केला.

नागपूर शहर गेल्या अनेक वर्षांपासून खड्डेमय रस्ते, ढासळलेल्या आरोग्य सुविधा, शिक्षणातील दुरवस्था, पाणीटंचाई आणि वाढती महागाई अशा समस्यांनी त्रस्त आहे. मात्र या ज्वलंत प्रश्नांवर जनतेच्या असंतोषाचे प्रतिबिंब निवडणूक निकालात उमटले नाही, ही बाब लोकशाहीसाठी अत्यंत चिंताजनक असल्याचे डॉ. राऊत म्हणाले.

विरोधी पक्षांचे मतविभाजन, धर्म व जातीच्या आधारावर झालेले ध्रुवीकरण आणि सत्ताधाऱ्यांची एकहाती पकड यामुळे लोकशाहीची मुळे कमकुवत होत असल्याचा इशाराही त्यांनी दिला. महानगरपालिका ही शहराच्या सर्वांगीण विकासासाठी असलेली स्वायत्त संस्था असून ती एका पक्षाच्या सत्ताकेंद्रात रूपांतरित होणे ही बाब धोकादायक असल्याचे मत डॉ. राऊत यांनी व्यक्त केले.

“हा निकाल नागपूरच्या विकासाचा जनादेश नसून लोकशाहीच्या मूल्यांवर झालेल्या आघाताचे प्रतीक आहे,” असे स्पष्ट करत काँग्रेसचे जेष्ठ नेते डॉ. नितीन राऊत यांनी सत्ताधाऱ्यांनी जाहिरातबाजी व दिखाऊ विकास नव्हे तर प्रत्यक्ष जनहिताचा कारभार करावा, अन्यथा येत्या काळात नागरिकांचा रोष अधिक तीव्र होईल, असा इशाराही दिला.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande