
नांदेड, 17 जानेवारी, (हिं.स.)। “हिंद-दी-चादर” श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या प्रचार–प्रसिद्धीसाठी नांदेड जिल्ह्यातील शाळा आज चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या उत्साही जयघोषाने दुमदुमून गेल्या. प्रभातफेऱ्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी “हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी” या घोषणांनी शाळा व परिसर भारावून टाकत सर्वत्र देशभक्तीमय वातावरण निर्माण केले.
जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये प्रभातफेऱ्यांच्या माध्यमातून हिंद-दी-चादर कार्यक्रमाची प्रभावी प्रचार–प्रसिद्धी करण्यात येत असून, या उपक्रमास विद्यार्थ्यांचा मोठ्या उत्साहाने सहभाग लाभत आहे. या माध्यमातून कार्यक्रमाबाबत रेव्यापक जनजागृती होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
आज हुतात्मा जयंतराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, हिमायतनगर (जि. नांदेड) येथे हिंद-दी-चादर कार्यक्रमाच्या अनुषंगाने आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच जि. प. केंद्रीय प्राथमिक शाळा सवना (ज.) येथेही वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. येथील विद्यार्थिनी कु. नियती भालेराव हिने प्रथम क्रमांक पटकावला. तसेच नांदेड तालुका, हिमायतनगर तालुका, देगलूर तालुका आदी ठिकाणी अनेक शाळांमध्ये प्रभातफेरी, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. नांदेड येथे तालुकास्तरीय गायन स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले.
या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये निबंध, चित्रकला, वक्तृत्व, गायन आदी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून, श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या त्याग, बलिदान व धर्मनिष्ठेचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis