
* महाराष्ट्र सदनात ग्रामीण संस्कृतीचा सुगंध दरवळणार
नवी दिल्ली, 02 जानेवारी (हिं.स.) : राजधानी दिल्लीत सध्या कडाक्याच्या थंडीचा जोर वाढला असून धुक्याची चादर पसरली आहे. अशा वातावरणात दिल्लीकरांना महाराष्ट्राच्या ग्रामीण संस्कृतीची ऊब देण्यासाठी कस्तुरबा गांधी मार्ग स्थित नवीन महाराष्ट्र सदनात ‘हुरडा पार्टी’ आणि ‘मकर संक्रांत महोत्सवा’चे 9 ते 11 जानेवारी या कालावधीत दु. 12 ते 9.30 या वेळेत आयोजन करण्यात आले असल्याची माहिती निवासी आयुक्त तथा सचिव श्रीमती आर. विमला यांनी दिली.
महाराष्ट्र सदनात डिसेंबर महिन्यात पार पडलेल्या ‘महाराष्ट्र खाद्य महोत्सवा’ला दिल्लीकरांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता, आता विशेषतः हिवाळी हंगामाची मेजवानी म्हणून 'हुरडा पार्टी'चे आयोजन करण्यात आले आहे.
संक्रांतीचा गोडवा आणि हुरड्याचा खमंग स्वाद
मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर आयोजित या महोत्सवात 'तिळगूळ' आणि पारंपरिक संस्कृतीचे दर्शन घडणार आहे. पुणे, सोलापूर, नाशिक आणि मराठवाड्यातील शेतांमध्ये ज्याप्रमाणे शेकोटीवर हुरडा भाजून आनंद साजरा केला जातो, तसाच अनुभव येथे दिला जाणार आहे. हुरड्यासोबतच खमंग लसूण चटणी, शेंगदाणा कूट, पिवळाधमक गूळ, साजूक तूप, ताक आणि चुलीवरचे वाफाळलेले पिठलं-भाकरी,भरीत भाकरी, बटाटेवडा, भजी सोबतच ऊस, बोरं, ओला हरबराअशा अस्सल गावरान पदार्थांची रेलचेल येथे असणार आहे.थंडी, शेकोटीची ऊब आणि संगीत मैफिलीत हुरड्याचा आस्वाद, असा दुग्धशर्करा योग या निमित्ताने जुळून येणार आहे. याबरोबरच संक्रात वाणासाठी महिलांनी बनविलेल्या विविध वस्तू विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत.
शहर आणि गाव यांना जोडणारा हा भावनिक पूल दिल्लीकरांना महाराष्ट्राच्या संस्कृतीच्या अधिक जवळ घेऊन जाणारा ठरणार आहे. 9 ते 11 जानेवारी दरम्यान नवीन महाराष्ट्र सदन येथे होणाऱ्या या महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होऊन महाराष्ट्राच्या आदरातिथ्याचा आणि चवीचा आनंद घ्यावा, असे आवाहन निवासी आयुक्त आर विमला आणि गुंतवणूक निवासी आयुक्त सुशील गायकवाड यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी